Advertisement

नियम धाब्यावर ठेवून जाहिरात? ७ बिल्डर आले गोत्यात!!

'महारेरा'चा नोंदणी क्रमांक न छापता, 'महारेरा'ची वेबसाईट न नोंदवता प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्या आणि नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील घरांची विक्री जाहिरातीद्वारे करणाऱ्या बिल्डरांविरोधात 'महारेरा'नं दंडात्मक कारवाई केली आहे.

नियम धाब्यावर ठेवून जाहिरात? ७ बिल्डर आले गोत्यात!!
SHARES

'महारेरा' कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन ८ महिने उलटले तरी बिल्डरांना अजून 'महारेरा'चा म्हणावा तसा धाक बसल्याचं दिसतं नाही. अनेक बिल्डर अजूनही 'महारेरा'तील तरतुदी, नियम धाब्यावर ठेवत गृहप्रकल्पांची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच फसव्या आणि महारेराला फाट्यावर मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या ७ बिल्डरांना 'महारेरानं'च दणका दिला आहे.


'असा' दिला दणका

'महारेरा'चा नोंदणी क्रमांक न छापता, 'महारेरा'ची वेबसाईट न नोंदवता प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्या आणि नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील घरांची विक्री जाहिरातीद्वारे करणाऱ्या बिल्डरांविरोधात 'महारेरा'नं दंडात्मक कारवाई केली आहे. ६ बिल्डरांना प्रत्येकी २ लाखांचा दंड तर एका बिल्डरला १२ लाखांचा दंड 'महारेरा'नं ठोठावल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरिष देशपांडे यांनी दिली. मुंबई ग्राहक पंचायतीच्या तक्रारीनुसारच 'महारेरा'नं ही दंडात्मक कारवाई केली आहे.


काय आहे नियम?

१ मे २०१७ पर्यंत ओसी न मिळालेल्या जुन्या-नव्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या विक्रीसाठी 'महारेरा'ची नोंदणी बंधनकारक आहे. सोबतच 'महारेरा'ची नोंदणी असलेल्या प्रकल्पांचीच जाहिरात करणं बिल्डरांना आता बंधनकारक असून या जाहिरातीत 'महारेरा' नोंदणी क्रमांक, 'महारेरा'ची वेबसाईट यासह अन्य माहिती देणंही बंधनकारक आहे. असं असताना बिल्डर अजूनही राजरोसपणे 'महारेरा'तील या तरतुदींना फाटा देत जाहिराती करत आहेत. अशाच ७ फसव्या बिल्डरांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने २ फेब्रुवारीला 'महारेरा'कडे तक्रार केली होती.


कोण आहेत हे बिल्डर?

गुडटाइम्स, लष्करिया हाऊसिंग, रिक्की राॅनी, अशर रिअॅल्टर्स, पुराणिक्स, संदिप लांडगे आणि काब्रा अॅण्ड असोसिएट या ७ बिल्डरांविरोधात तक्रार होती. यातील काही बिल्डरांनी 'महारेरा' नोंदणीशिवाय जाहिरात केली होती, तर काही जाहिरातींमध्ये नोंदणी क्रमांक नव्हता, 'महारेरा'च्या वेबसाईटचा क्रमांक नव्हता, ४ प्रकल्पांची जाहिरात असेल, तर त्यातील एकाची नोंदणी नव्हती अशा 'महारेरा'तील अनेक तरतुदीचं उल्लंघन या बिल्डरांनी केल्याची तक्रार होती.


यापुढेही राहणार लक्ष

या तक्रारीनुसार महारेरानं चौकशी करत ७ बिल्डरांविरोधात दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई या बिल्डरांसाठी दणका असल्याचं म्हणत अॅड. देशपांडे यांनी यापुढेही अशा फसव्या बिल्डरांवर बारकाईनं लक्ष ठेवत त्यांच्याविरोधात तक्रारी करणार असल्याचं स्पष्ट केलं.


कुणाला किती दंड?

बिल्डर
दंड
गुडटाइम्स
२ लाख रू.
लष्करीया हाऊसिंग
२ लाख रू.
रिक्की राॅनी
२ लाख रू.
अशर रिअॅल्टर्स
२ लाख रू.
पुराणिक्स
२ लाख रू.
संदीप लांडगे
२ लाख रू.
काब्रा अॅण्ड असोसिएट
१२ लाख रू.

 

प्रकल्पाच्या ५ टक्के दंडाची तरतूद

एकूण प्रकल्पाच्या ५ टक्के दंड आकारण्याची तरतूद महारेरा कायद्यात आहे. असं असताना महारेरानं या प्रकल्पांना कमी दंड लावल्यानं थोडी नाराजीही व्यक्त होत आहे. कारण लाख २ लाखांची रक्कम बिल्डरांसाठी फुटकळ असल्यानं त्यांना यामुळे चाप बसणार नसल्याचं म्हणत प्रकल्पाच्या एकूण रक्कमेच्या ५ टक्के दंड आकारण्याची मागणी या निमित्ताने पुन्हा उचलून धरली जात आहे.



हेही वाचा-

पुड्या सोडणाऱ्या बिल्डरला 'महारेरा'ने 'अशी' घडवली अद्दल!

बिल्डरांना दणका! ग्राहकांना दिलेला चेक बाऊन्स झाल्यास 'महारेरा'ची नोंदणी रद्द!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा