सेन्सेक्सने गाठली 30,583 ची सर्वोत्तम पातळी

  Kala Ghoda
  सेन्सेक्सने गाठली 30,583 ची सर्वोत्तम पातळी
  मुंबई  -  

  केंद्रात नरेंद्र मोदी सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असतानाच दमदार खरेदीच्या जोरावर देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी आजपर्यंतचा सर्वोत्तम स्तर गाठला. शेअर बाजारातील 100 हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यातील उच्चांकी आकडेवारी नोंदवली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ 260.5 अंकांनी वाढून 30,583 च्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ 67 अंकांनी वाढून 9,512 वर जाऊन पोहोचला.

  चांगल्या कामगिरीच्या जोरावर ‘निफ्टी’ने पहिल्यांदाच 9500 च्या पलिकडे झेप घेतली आहे. तर ‘सेन्सेक्स’ देखील पहिल्यांदाच 30,600 अंकांच्या जवळपास बंद झाला. ‘सेन्सेक्स’मध्ये 0.75 टक्क्यांहून अधिक आणि ‘निफ्टी’त 0.7 टक्क्यांची तेजी दिसून आली.

  या कारणांमुळे नोंदवली सर्वोत्तम कामगिरी -
  अमेरिकन बाजारपेठ सोमवारी सर्वोत्तम दर गाठत बंद झाली. परिणामी आशियातील बाजारपेठाही तेजी नोंदवतच सुरू झाल्या. एप्रिलमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली होती. त्यातुलनेत परदेशी गुंतवणूकदारांची देशांतर्गत बाजारातील खरेदी वाढली आहे. सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल वाढला. आयटीसी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअटेल आणि एचडीएफसी इ. महत्त्वाच्या कंपन्यांमधील शेअर्सची खरेदी वाढल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

  आयटी, एफएमसीजी, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि रियाल्टी शेअर्सच्या वधारलेल्या किमतीचा शेअर बाजाराला आधार मिळाला. निफ्टीत आयटी इंडेक्समध्ये 1.2 टक्के, एफएमसीजी इंडेक्समध्ये 1 टक्का आणि ऑटो इंडेक्समध्ये 1.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर बीएसईतील कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये 0.7 टक्के आणि रियाल्टी इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली. बँक निफ्टीही 0.5 टक्क्यांनी वाढला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.