सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड सुरूच, 31,109.28 चा नवा उच्चांक गाठला

  Kala Ghoda
  सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड सुरूच, 31,109.28 चा नवा उच्चांक गाठला
  मुंबई  -  

  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या आठवड्यातली विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली आहे. सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्सने 31,109.28 अंकांचा नवा उच्चांक गाठला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 9600 अंकांचा टप्पा ओलांडत पहिल्यांदाच 9604.90 चा उच्चांक नोंदवला आहे. कमकुवत सुरूवात झाल्यानंतरही देशांतर्गत शेअर बाजाराने दिवसअखेर चमकदार कामगिरी केली हे विशेष. बँकिंग, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस आणि पॉवर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला.

  बँक निफ्टीनेही गाठला उच्चांक -
  बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या खरेदीच्या जोरावर सोमवारी निफ्टी बँक इंडेक्स सर्वोत्तम पातळीवर पोहोचला. बँक निफ्टीने 23464 हा नवा उच्चांक गाठला आहे. एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एसबीआय बँकेच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने मोठी खरेदी होताना दिसत आहे.

  एफएमसीजी आणि ऑटो शेअरमध्येही चांगली खरेदी होत आहे. निफ्टीच्या एफएमसीजी इंडेक्समध्ये 1.75 टक्के आणि ऑटो इंडेक्समध्ये 0.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर निफ्टीच्या आयटी इंडेक्समध्ये 1.6 टक्के आणि फार्मा इंडेक्समध्ये 3.3 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. बीएसईच्या रियाल्टी इंडेक्समध्ये 4.4 टक्के आणि पॉवर इंडेक्समध्ये 1.2 टक्क्यांची घसरण झाली.

  दिवसभराच्या व्यवहारात एचयूएल, पॉवर ग्रीड, सिप्ला, एचडीएफसी, भारती इंफ्राटेल, आयटीसी आणि हिरो मोटो 3.5 ते 1.6 टक्क्यांच्या दरम्यान मजबूत झाले. तर टेक महिंद्रा, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, अरविंदो फार्मा, येस बँक, बीएचईएल, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय 11.6 ते 1.4 टक्क्यांच्या दरम्यान घसरून बंद झाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.