Advertisement

मुडीजचा बुस्टर, सेन्सेक्स २३६ अंकांनी उसळला


मुडीजचा बुस्टर, सेन्सेक्स २३६ अंकांनी उसळला
SHARES

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजने १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात (रेटींग) सुधारणा केल्याचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर झाला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३६ अंकांनी उसळून ३३,३४३ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६९ अंकांनी वाढून १०,२८४ वर पोहोचला.


सुरूवात सकारात्मक

रेटींग वाढल्याच्या आनंदाने वाढ नोंदवतच बाजार सुरू झाला. सेन्सेक्स २८२ अंकांनी वाढून ३३,३८८.४७ वर सुरू झाला. तर दुसऱ्या बाजूला निफ्टी देखील ११० अंकांची वाढ नोंदवून १०,३२४.५५ वर सुरू झाला. शेअर्सची चौफेर खरेदी झाल्याने एकवेळेस सेन्सेक्स ४१४ अंकांनी आणि निफ्टी १२८ अंकांनी उसळला होता. मात्र शेअर्सच्या किमती वाढल्याने नफा कमावण्याच्या उद्देशाने विक्रीलाही सुरूवात झाली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा काही अंक खाली आले.


कुठे वाढ?

शुक्रवारी मीडकॅप आणि स्माॅलकॅप शेअर्समध्ये जोश दिसून आला. बीएसईचा मीडकॅप इंडेक्स १ टक्क्यांनी वाढून बंद झाला. निफ्टीच्या मीडकॅप इंडेक्समध्येही १ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर बीएसईचा स्माॅलकॅप इंडेक्स ०.८ टक्क्यांनी वधारला.

बॅंकिंग, आटो, एफएमसीजी, मेटल, फार्मा, रियाल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि पाॅवर शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसली. बँक निफ्टी १.१ टक्क्यांच्या वाढीसह २५,७२८.४ च्या नव्या उच्चांकाला पोहोचला. तर निफ्टीच्या पीएसयू बँक इंडेक्समध्ये १ टक्का, आॅटो ०.९ टक्के, एफएमसीजी इंडेक्स ०.८ टक्के, मेटल इंडेक्स १.९ टक्के आणि फार्मा इंडेक्समध्ये ०.९ वाढ नोंदवण्यात आली. त्याचसोबत आयटी शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा