Advertisement

100 टक्के पावसाच्या अंदाजाने सेन्सेक्समध्ये 315 अंकांची उसळी


100 टक्के पावसाच्या अंदाजाने सेन्सेक्समध्ये 315 अंकांची उसळी
SHARES

भारतीय हवामान खात्याने बुधवारी देशभरात सरासरी 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या अंदाजाचा देशांतर्गत बाजारपेठेवर अत्यंत सकारात्मक परिणाम झाल्याने मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने दिवसअखेर सर्वोत्तम पातळी नोंदवलीय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) सेन्सेक्स 315 अंकांची वाढ नोंदवत 30248 च्या उच्चांकी पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक निफ्टीनेही 90 अंकांची वाढ नोंदवून 9407 वर झेप घेतलीय.

खाद्यपदार्थांचे दर आवाक्यात राहण्याचा अंदाज -

ग्लोबल आणि देशांतर्गत बाजारपेठेतून सकारात्मक संकेत मिळाल्याने बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. भारतीय हवामान खात्याने गेल्या वेळेस सरासरीच्या तुलनेत 96 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने मागच्या अंदाजात सुधारणा करत 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने बाजारात उत्साह संचारला. हा अंदाज देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत पोषक मानला जातोय. याचसोबत देशात खाद्यान्नाच्या उत्पादनात रेकॉर्डब्रेक वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती नियंत्रणात येतील, असे म्हटले जातेय. महागाई दर नियंत्रणात राहिल्यास कंपन्यांचा खर्च आटोक्यात राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे बाजारपेठेत खासकरून एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.

बीएसईची मार्केट कॅप 126 लाख कोटींवर - 

आशियातील बाजारातल्या मजबुतीचाही आधार देशातील स्टॉक मार्केटला मिळालाय. मागच्या काही दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारातून फॉरेन फंड्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री सुरु होती. परंतु मंगळवारपासून परकीय गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारातील स्थिती सुधारण्यास मदत झालीय. याआधारे मुंबई शेअर बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांची मार्केट कॅप 126 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलीय. यापूर्वी मे महिन्यात ‘बीएसई’ची मार्केट कॅप 4 मे रोजी 125.61 लाख कोटी रुपयांच्या सर्वोत्तम पातळीवर पोहोचली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा