Advertisement

Share Market भाग ३ : जाणून घेऊया शेअर बाजाराचा इतिहास

मागील काही वर्षांपासून काॅम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून कोणीही घरबसल्या शेअर्स खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो. अवघ्या काही सेकंदामध्ये हा व्यवहार पूर्ण होतो. आता तर मोबाइल अॅप्समार्फतही आपण हे व्यवहार अगदी सहजपणे करू शकतो.

Share Market भाग ३ : जाणून घेऊया शेअर बाजाराचा इतिहास
SHARES

भारतात मुंबई शेअर बाजार (bse – bombay stock exchange) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (nse – national stock exchange)  हे दोन मुख्य शेअर बाजार आहेत. ह्या दोन एक्सचेंजवर सर्वाधिक ट्रेडिंग होतं. देशाच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक वर्तुळात मुंबई शेअर बाजाराला मोठं महत्त्व आहे. मुंबई शेअर बाजारात होणाऱ्या घडामोडींकडे जगभरातील गुंतवणूकदारांचं बारकाईने लक्ष असतं. हा शेअर बाजार कसा सुरू झाला, याचा इतिहास आपण जाणून घेऊया.


जन्मस्थान वडाचं झाड

मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४२ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली झाली. व्यापारी प्रेमचंद राॅयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. प्रेमचंद राॅयचंद हे व्यापारी राॅयचंद दीपचंद यांचे पुत्र होते. सफाईदारपणे इंग्लीश बोलणाऱ्या प्रेमचंद यांनी १८४९ मध्ये शेअर ब्रोकर म्हणून कामाला सुरूवात केली. कापूस आणि सोन्याच्या व्यवसायात त्यांनी आपला दबदबा तयार केला. मुंबई शेअर बाजाराचं जन्मस्थान हे १८५० मध्ये एक वडाच्या झाडाखाली आहे. सद्या हे ठिकाण हार्निमन सर्कल नावाने ओळखलं जातं. टाऊन हाॅलजवळ वडाच्या झाडाखाली प्रेमचंद राॅयचंद आणि इतर दलाल लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या धंद्यांची दलाली करायचे. मुख्यतः यावेळी कापसाचे सौदे व्हायचे. सुरूवातील ४ गुजराती आणि एक पारसी हे दलाल होते. या दलालांना बसण्यास अशी विशिष्ट जागा नव्हती. तसंच वेळेचं बंधन आणि कुठलेही नियमही नव्हते.

टाऊनहाॅलसमोरील वडाच्या झाडाखाली हे सर्व दलाल लोक एकत्र येत असत. हळूहळू या ठिकणी दलालांची संख्या वाढली. त्यामुळे येथे जागा अपुरी पडू लागली. १८७४ च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतर 'द नेटीव शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर्सही संस्था १८७५ स्थापन होऊन व्यवहार सुरू झाले . प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी 'द नेटीव शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर्स'चे संस्थापक सदस्य होते. 'द नेटीव शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर्स'ची सुरूवात २५ शेअर दलालांनी अवघ्या एका रुपयात केली होती. ३१ ऑगस्ट १९५७ रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट अॅक्ट १८५६ अन्वये मान्यता दिली. अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला. सध्या मुंबई शेअर बाजार हा जगातील ११ व्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे


काही सेकंदामध्ये व्यवहार

शेअर बाजार हा एक असा बाजार आहे की ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी - विक्री केली जाते. सुरूवातीला शेअर्सची खरेदी - विक्री तोंडी होत असे. खरेदीदार आणि विक्रेता लिलावामार्फत हे व्यवहार करत होते. मात्र, आता हे सर्व व्यवहार शेअर बाजाराच्या नेटवर्कने जोडलेल्या काॅम्प्युटरमार्फत होतो. इंटरनेटवरही ही सुविधा मिळते. आता अशी परिस्थिती आहे की खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांना ओळखूही शकत नाहीत. काही वर्षापूर्वी मुंबई शेअर बाजारात थेट खरेदी - विक्री करावी लागत होती. मात्र, मागील काही वर्षांपासून काॅम्प्युटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून कोणीही घरबसल्या शेअर्स खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो. अवघ्या काही सेकंदामध्ये हा व्यवहार पूर्ण होतो. आता तर मोबाइल अॅप्समार्फतही आपण हे व्यवहार अगदी सहजपणे करू शकतो. माहीत तंत्रज्ञान क्रांतीचे हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. जे काम पूर्वी फक्त काही पैसेवालेच करू शकत होते ते आता एक सर्वसामान्य माणूसही करू शकतो. डीमॅट खात्यामार्फत शेअर विकत घेऊ शकतो आणि विकू शकतो.


नफ्यात भागीदार

शेअर बाजार हा कोणत्याही विकसीत अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. ज्याप्रमाणे कोणताही देश, गावे किंवा शहरे यांच्या विकासासाठी रस्ता, वीज, पाणी, रेल्वे यांची गरज असते त्याचप्रमाणे देशातील उद्योगांच्या विकासासाठी शेअर बाजार आवश्यक आहे. उद्योग धंदे चालवण्यासाठी भांडवलाची गरज असते. हे भांडवल त्यांना शेअर बाजारातून मिळते. शेअर बाजारामार्फत कोणताही सर्वसामान्य माणूस मोठ्या उद्योगामध्येही आपली भागिदारी करू शकतो. या भागीदारीतून उद्योगांना होणाऱ्या नफ्यामध्ये हिस्सेदार बनू शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला वाटले की रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस या कंपन्या चांगला नफा कमावतील. तर तो या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून या नफ्यात भागीदार होऊ शकतो. लाभांशाच्या रुपयाने शेअर्स होल्डरला आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो. हे सर्व व्यवहार करण्यासाठीची व्यवस्था शेअर बाजार पुरवते. सर्व गुंतवणूकदारांना एक समान संधी मिळेल याची काळजी शेअर बाजार घेते.

 

शेअर बाजाराची कार्यप्रणाली

 प्रत्येक कंपनीला व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज पडते. या कंपन्या शेअर बाजारात आपले शेअर्स विकून भांडवल उभे करतात.  बहुतांशी कंपन्या व्याज देऊन कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजारातून भांडवल उभारण्यास प्राधान्य देतात. प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ -IPO) या कंपन्या शेअर बाजारात सर्वसामान्य व्यक्तींना शेअर्स विकून पैसे गोळा करतात. आयपीओ काढून शेअर्स विक्री करणे यालाच प्राथमिक शेअर बाजार  (primary market) म्हणतात. आयपीओ नंतर त्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. म्हणजे ती कंपनी लिस्टेड होते. त्यानंतर तिच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगला सुरुवात होते. तर ज्या कंपन्या आधीच शेअर बाजारात लिस्टेड असतात त्या कंपन्यांच्या शेअर्सची रोज खरेदी - विक्री होते. यालाच दुय्यम बाजार (Secondary market) म्हणतात.



हेही वाचा  -

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा