Advertisement

एका मिस्ड कॉलने जीवन बदलले, अॅसिडहल्ल्यातील पीडितेसोबत 'त्याने' केले लग्न


एका मिस्ड कॉलने जीवन बदलले, अॅसिडहल्ल्यातील पीडितेसोबत 'त्याने' केले लग्न
SHARES

मिस्ड कॉलने हैराण झालेल्यांचे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत ऐकलेले असतील. पण याच मिस्ड कॉलने अॅसिडहल्ल्यातील एका पीडितेला तिचा जोडीदार मिळवून दिल्याचे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. चुकून लागलेल्या फोनच्या माध्यमातून टेलिफोन ऑपरेटर राहुल कुमार (27) ची ओळख अॅसिड हल्ल्यातील पीडित ललिता बन्सी (26) सोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि राहुलने अत्यंत धाडसाने ललितासोबत लग्न करण्याचा निर्णय घेत समाजापुढे मोठा आदर्श ठेवला. या दोघांचा विवाह डिसिल्वा टेक्निकल कॉलेज, दादर येथे मंगळवारी मोठ्या थाटात झाला.

ललितावर तिच्या चुलत भावांनी 2012 मध्ये कौटुंबिक कारणांतून अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात ललिता अत्यंत गंभीररित्या भाजली होती. त्यात तिचे डोळे, केस, नाक, कान, कपाळ यांना गंभीर इजा झाल्याने तिचा संपूर्ण चेहराच विद्रूप झाला आहे. ललितावर बॉम्बे रुग्णालयात उपचार करण्यात आले असून तिच्यावर आतापर्यंत 17 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तर अजून 12 शस्त्रक्रिया होणे बाकी आहेत. यानंतर 2016 मध्ये ती साहस फाऊंडेशनची सदस्या झाली. संस्थेच्या मदतीने तिने आंबा विक्रीचा व्यवसायही सुरू केला.

त्यातच साधारणत: साडेतीन महिन्यांपूर्वी एका खासगी कंपनीत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला असलेल्या राहुल कुमारने चुकून ललिताला फोन केला होता. दोघांमध्ये सुरू झालेल्या संवादाचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. आपण अॅसिड हल्ल्यातील पीडित असून आपला चेहरा विद्रूप असल्याचे ललिताने राहुलला सांगितले. परंतु त्याची पर्वा न करता राहुलने अत्यंत धाडसाने तिच्यासोबतचे प्रेमसंबध पुढे कायम ठेवले. एवढेच नव्हे, तर साडेतीन महिन्यानंतर लग्नाचा निर्णयही घेतला. राहुलच्या निर्णयाचा स्वीकार त्याच्या कुटुंबीयांनीही अत्यंत आदराने केला.

अॅसिड हल्ल्यातील पीडितेशी लग्न करण्याचा साधा विचारही जेथे कुणी केला नसता, तेथे राहुलने ललितासोबत संसार करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना क्रांतीकारी वाटला. त्यातूनच या दोघांचे लग्न लावून देण्यासाठी उद्यमी महाराष्ट्र, साहस फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ शिवाजी पार्क आदी संस्थांनी पुढाकार घेतला. या संस्थेच्या सदस्यांनी लग्न मंडपापासून त्यांचे कपडे आणि हनीमूनपर्यंतच्या साऱ्या खर्चाचा भार उचलला.

ललिताच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केले, तर या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेला अभिनेता विवेक ऑबेरॉय याने ललिताला भेटवस्तू म्हणून एक फ्लॅट दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा