Advertisement

मुंबईत फिरताहेत रंगीबेरंगी हत्ती!

लोकसंख्येचा फुगा वाढतोय तशी जंगलं कमी होत चालली आहेत. त्यामुळे हत्ती या सुंदर, भव्य आणि महाकाय प्राण्याचं घर हरवलंय. त्यांना त्यांचं घर पुन्हा मिळवून देण्यासाठी 'एलिफंट परेड इंडिया' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबईत फिरताहेत रंगीबेरंगी हत्ती!
SHARES

स्वप्नात पाहिली राणीची बाग...हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग...लहानपणी ऐकलेली ही बडबडगीतं आठवतात का? लहानपणी गीतातील या ओळी मजेशीर वाटायच्या. पण आता मात्र हत्तीच्या पाठीवर नागाच्या ऐवजी माणूसच बसलाय. तोच माणूस ज्याच्यामुळे हत्तीचं जग हळूहळू नाहीसं होतंय. लोकसंख्येचा फुगा वाढतोय तशी जंगलं कमी होत चालली आहेत. या सुंदर, भव्य आणि महाकाय प्राण्याचं घर हरवलंय. त्यांना त्यांचं घर पुन्हा मिळवून देण्यासाठी 'एलिफंट परेड इंडिया' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एलिफंट फॅमिली आणि गुड अर्थ यांच्या सहयोगानं 'एलिफंट परेड' या शिल्पकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.



एलिफंट परेड म्हणजे नेमकं काय?

ऐन वस्तीतून हत्तींचा कळप शिरल्यानं पिकांची, मानवी वस्तीची नासधूस झाल्याच्या घटना अनेकदा पाहिल्या असतील किंवा ऐकल्याही असतील. पण जंगलात राहणाऱ्या या प्राण्याला असं भरवस्तीत शिरायची गरज का लागली? याचा सहसा विचार केला जात नाही. हाच विचार जागतिक स्तरावर करण्यात आला असून हत्तींना वाचवण्यासाठी 'एलिफंट परेड' मोहीम सुरू करण्यात आली आहे.



१०१ रंगीबेरंगी हत्तींचे हे पुतळे मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. वरळी, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी हे रंगीबेरंगी हत्ती विराजमान झाले आहेत. यामध्ये फॅशन डिझायनर्सपासून आदिवासी कलाकारापर्यंत समाजातील सगळ्या स्तरातील कलाकारांचा सहभाग आहे. या उपक्रमात सुबोध गुप्ता, मसाबा गुप्ता, तरुण ताहिलियानी यांसारख्या डिझायनर्सनी हत्तीच्या पाठीवर नक्षीकाम केले आहे. आणखी दोन आठवडे तरी हे रंगीबेरंगी हत्तींचे कळप मुंबईत विविध ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.



हत्तींच्या शिल्पकृती मागील उद्देश

गेल्या अनेक वर्षांमध्ये हत्तींच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात जनजागृती आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एलिफंट परेड हत्तींबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या रंगीबेरंगी मोहिमेतून साध्य काय होणार? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या शिल्पकृतींचा लंडनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून मिळालेल्या निधीतून भारत आणि अन्य आशियाई देशांमधला काही जंगलाचा भाग विकत घेण्यात येणार आहे.

हे रंगीत हत्ती पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत आहे. हत्तींना पाहायला येणारे मुंबईकर त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत. पण मुंबईकरांनी फक्त फोटो न काढता त्यांचं महत्त्व समजून घेणं देखील आवश्यक आहे. तरच मानव-प्राणी नातं अधिक दृढ होईल.



हेही वाचा

घरात एकट्या मांजरीचा सांभाळ कोण करणार? गार्डियन ऑफ द पर आहेत ना!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा