Advertisement

कामगार दिन विशेष : नाका कामगार आजही उपेक्षितच! जगण्यासाठी करतोय संघर्ष

एकूणच कामगार आणि कर्मचारी जगत निराशेच्या खाईत असल्याचे चित्र आहे. बांधकाम कामगार आणि इतर रोजंदारी कामगार दररोज लेबर नाक्यावर जमतात. त्यांचे काम अत्यंत कष्टाचे, तरीही कमी पगाराचे आहे. शिवाय काम मिळेल याचीही खात्री नाही.

कामगार दिन विशेष : नाका कामगार आजही उपेक्षितच! जगण्यासाठी करतोय संघर्ष
SHARES

रोज काम मिळेल याची खात्री नाही, काम जरी मिळाले तरी त्याचा योग्य मोबदला मिळत नाही,  त्यामुळे इतक्या कमी पैशात घर कसं चालवायचं? घरभाडे भरायचे की कुटुंबाचे पोट? आम्ही जगायचं कसे ? असा सवाल नाका कामगार मजूरांकडून केला जातोय. 

मुंबई आणि उपनगरातील काही भागातील नाक्यांवर तुम्हाला हे मजूर दिसले असतील. या नाका कामकागारांची सकाळ काम शोधण्यापासून सुरू होते. वर्षाचे बाराही महिने त्यांना दिवसाच्या रोजगारासाठी झटावे लागते. 

मुंबईतील चेंबूर, वरळी, मानखुर्द, कुर्ला, कांदिवलीतील क्रांतीनगर, गोरेगावमधील विरवाणी अशा बऱ्याच ठिकाणी पहाटेच कामगार येऊन बसलेले असतात. एखाद्या अमूक एका कंपनीचा कंत्राटदार येतो आणि आवश्यक असेल त्या कामगारांना घेऊन जातो. पण नेहमीच काम मिळले असे नाही. बऱ्याचश्या कामगारांना दुपार होऊनही काम मिळत नाही. मग काय? निराश मनाने पुन्हा त्यांना माघारी परतावे लागते. 

मी गेली 25 वर्षे नाका कामगार म्हणून काम करत आहे. पेंटिंगचं काम मी करतो. दिवसाला मला 700 रुपये मिळतात. पण कामाची काही खात्री नसते. आज काम मिळाले तर उद्या हाताला काम असेलच असे नाही. रोज मी सकाळी 7-8 वाजेपर्यंत नाक्यावर येतो. कॉन्ट्रॅक्टरकडे काम असेल तर तो साईटवर कामासाठी घेऊन जाईल नाहीतर आम्हाला घरी परतावे लागते. बऱ्याचदा एक-एक आठवडा काम नसते. 

राजेंद्र दळवी, नाका कामगार 

वाढत्या महागाईत कुटुंबव्यवस्था चालवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. पुरेसे उत्पन्न आणि भांडवल नसल्याने स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासही अडचण. अशाही स्थितीत कौटुंबिक पाठबळामुळे कामगार विश्व तगून आहे, अडचणींतून मार्ग काढत वाटचाल करीत आहे.

अनेक नाका कामगारांच्या हाताला काम नसले की घर चालवणे कठिण जाते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पडतील ती कामे करतात. काहींच्या घरात ज्वेलरी इमिटेशन सारखी कामे करून घर खर्च चालवतात, असे राजेंद्र दळवी यांनी सांगितले. 

यातील काही कामगार मागील वीस- वीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यामध्ये काही कला कुशल कारागीर सुद्धा आहेत. जसे कि पेंटर, सुतार, फिटर, गटार सफाई, बिगारी यांचा ही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अपुरे शिक्षण असल्यामुळे असुरक्षितता आणी त्यात दिवसेंदिवस कामाचा ताळमेळ बसत नाही. त्यात वाढणारी महागाई आणि कुटुंब यांचा वाढणारा ताण हा वेगवेगळ्या प्रकारे सहन करावा लागतो. 

गेली अनेक वर्ष मी नाका कामगार म्हणून कडियेचे काम करतोय. इतर कामगारांप्रमाणेच माझी अवस्था आहे. काम मिळाले तर दिवसाचे 1200 रुपये मिळतात. काम नसेल तर या 1200 रुपयांवर गुजराण करावी लागते. अशा हालाकिच्या परिस्थितीतही दोन मुलींना 12वी पर्यंत शिकवले. पण शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांचं शिक्षण बंद केले. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. पैसे नाहीत तर कुठून शिकवणार? 

मुन्ना राजघर, नाका कामगार

शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा कामगारच आज उपेक्षित आहे. कामगार म्हणून समाजमान्यता अद्याप यांना मिळाली नाही. कायम नोकरी, बोनस, ग्रॅच्युईटी, वेतन करार, वेतनवाढ, कॅन्टीन सुविधा, वैद्यकीय मदत, कामगार पतसंस्था, त्याद्वारे पतपुरवठा, कामगार कल्याणकारी योजनांचे लाभ अशा अनेकविध बाबींपासून हे कंत्राटी कामगारविश्व जवळपास वंचित आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कायदा 1996, त्यात असलेल्या तरतुदीनुसार कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे अनिवार्य होते. महाराष्ट्र सरकारने 2007ला बोर्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात सर्व प्रकारच्या बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि इतर लाभ मिळावा अशी योजना होती. परंतु 1 मे 2011 रोजी या बोर्डची स्थापना केली ज्यात एकूण 23 योजना नमूद आहेत. 

यातील योजना 4 योजना म्हणजेच घर खरेदी घर दुरस्ती व दोन बिमा योजना अशा 4 योजना कमी करून त्यात फक्त 19 योजना ठेवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये नोंदीत कामगाराच्या मुलांना शैशणिक मदत, आरोग्य बिमा योजना तसेच कामगाराला आर्थिक मदत महिला असेल तर बाळंतपण आणि वैदकीय मदत, बांधकाम कामगारास बांधकाम संबधित साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहय्य मिळणार अश्या विविध योजना या अंतर्गत आहेत. पण योजनांचा लाभ देखील कामगारांना मिळत नाही आहेत. 

आमच्यासाठी काहीच सोई-सुविधा नाहीत. कामगारांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवर्ती देखील बंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी शिष्यवर्तीचे फॉर्म भरले होते ते देखील रिटर्न केले. केवळ एक वर्ष शिष्यवर्ती योजनेचा लाभ झाला होता. त्यात देखील 2100 रुपये  मिळाले होते. त्यानंतर काही पैसे मिळाले नाहीत. विमाचा देखील आमच्याकडून फॉर्म भरून घेतला. पण त्यावर अमलबजावणी झाली नाही.  

सिताराम नागपुरणे, कामगार

 

बांधकाम क्षेत्रात मी प्लॅस्टरचे काम करतोय. सरकारने दिलेल्या योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही आहेत. आम्हाला कामगार संघटनेचे शिष्यवर्तीचे जे काही पैसे देण्यात येतात ते आमच्यापर्यंत पोहचत नाहीत. दुसरे म्हणजे कामगारांना मंडळाकडून एक सामानाची किट देण्यात येते ती किट देखील आम्हाला मिळत नाही.  

भरत बिरादार, कामगार

तसेच आता बोर्ड मध्ये नोंदणी करायची असेल तर अट आहे. 90 दिवस काम केल्याचा दाखला (प्रमाणपत्र) असणे अनिवार्य आहे आणि ते असेल तरच यामध्ये कामगारांची नोदणी होईल. ही नोदणी एक वर्षाची असेल अशा प्रकारची ही सरकाची योजना आहे. पण बोर्डात नोंदणी करण्याची प्रक्रिया फार किचकट आहे. 

बांधकाम कल्याणकारी बोर्ड या बोर्ड मध्ये नोदणी करायची असेल तर 90 दिवस काम केल्याचे प्रमणपत्र लागते आणि हे प्रमाणपत्र कोणीही ठेकेदार देण्यास तयार नसतो. आणि नाका कामगारांचे एकाच ठेकेदाराकडे कायमस्वरूपी काम नसल्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळवणे कठीण जात आहे. कारण ठेकेदार कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. आणि जोपर्यंत हे प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत कामगारांची नोंदणीच होत नाही.

पण जे कामगार अनेक वर्षे एकाच ठेकेदाराकडे काम करत आहेत या कामगारांना यांचे ठेकेदार 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत आहेत आणि ठेकेदार यांची नोंदणी करण्यास मदतही करत आहेत. 

नोंदणी करताना आम्हाला व्यवस्थित माहिती दिली जात नाही. इकडून-तिकडे नुसते फिरवले जाते. आमचे पेपर जमा केले आणि गहाळ करून टाकले आहेत. आम्ही स्वत: तिकडे गेलो तेव्हा सगळे पेपर गहाळ केले होते. एकाजागी पेपरच नव्हते. बऱ्याचदा कॉन्ट्रेक्टर आम्हाला सही देण्यास नकार देतो. नोंदणी करताना देखील अनेक समस्यांचा आम्हाला सामना करावा लागतो.   

राजू कुटे, अध्यक्ष, मुंबई बांधकाम कामगार युनियन, क्रांतीनगर  

नाका कामगारांच्या शोषणाविरोधात गेले अनेक वर्ष कामगार आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू) लढत आहे. त्यांच्या मागण्यांसाठी सीआयटीयू आजही संघर्ष करत आहे. नाका कामगारांच्या विविध मागण्या घेऊन सीआयटीयूने अनेक मोर्चे देखील काढले आहेत. या मोर्च्यांमध्ये कामगार देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. 

काय आहेत मागण्या?

 • नाका कामगारांना दररोज काम मिळाले पाहिजे
 • ज्या कामगारांना दररोज काम मिळणार नाही अशा कामगारांना महापालिका, एम.एम.आर. डी. ए. कामावर काम मिळाले पाहिजे.
 • बांधकाम नाका कामगारांच्या नाक्यावर याद्या तयार कराव्यात आणि त्या आधारे त्यांची नाक्यावरच नोंदणी करावी. यासाठी एक महिना अभियान राबवावे.
 • नाका कामगारांची नोंदी करताना 90 दिवसाटी अट रद्द करावी.
 • सर्वच कामगारांना सुरक्षा किट तात्काळ देण्यात यावे. 
 • रोजगाराची अनिश्चितता
 • जाचक अटींमुळे नोंदणीतून कामगार बाहेर
 • केंद्र- राज्याच्या योजनांचा थेट फायदा नाही
 • कामगार कायद्यामुळे कोट्यवधी कामगार हक्कांपासून वंचित 
 • आरोग्य आणि जीवन सुरक्षेसासाठी कायद्यात बदल करा
 •  नाक्यावर कामगारांच्या नोंदणीसाठी यंत्रणा उभारावी

दुसऱ्यांची घरं, इमारती आम्ही उभारतो. पण आमचा राहण्याचा ठिकाणा नाही, वेळेवर पाणी नाही, शौचालय नाही, प्राथमिक सुविधा नाहीत. बोर्डाच्या GR मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत, पण अमलबजावणी मात्र झिरो... कामगारांना देण्यात येणाऱ्या किटच्या बिलामध्येही झोल करण्यात येतोय. GR नुसार शिष्यवर्ती देखील दिली जात नाही. 2022 मध्ये एकदाच दिली गेली. 2023 आणि 2024 मधल्या शिष्यवृत्तीचा अता-पताच नाही.  

गोपाल गुडमे, सचिव, नाका कामगार यूनियन, सीआयटीयू

गोपाल गुडमे पुढे म्हणाले की, आरोग्यासाठी काही सुविधा नाही. GR मध्ये दिले आहे की, एखाद्याला हार्ट अटॅक आला  आणि अकस्मात मयत झाली तर दोन लाख रुपये मोबदला किंवा 5 वर्ष त्या पत्नीला प्रति दोन महिने 2000 अशी मदत मिळेल. पण मी एका कामगारासाठी दोन वर्ष लढतोय. पण आतापर्यंत एक रुपया मिळाला नाही. त्यामुळे आमच्या आरोग्याचेही तीन तेरा वाजले आहेत.     

सरकार मोठे-मोठे GR काढतोय. सरकार येतंय जातंय. पण आमच्या समस्या आहेत तशा आहेत. काम मिळाला तर मुंबईतला कामगार जगू शकेल. पण सरकार फक्त वोट बँक म्हणून आमच्याकडे पाहते, अशी खंत गोपाल गुडमे यांनी व्यक्त केली. 

फक्त रोजगारासाठीच नाही तर रोजच्या जगण्यासाठी देखील आम्हाला संघर्ष कारावा लागत आहे. आमच्या राहण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत सर्वच समस्यांची डोक्यावर टांगती तलवार आहे. आम्हाला पक्की घरं नाही. 90 टक्के कामगार भाड्याच्या झोपड्यांमध्ये राहतात. विकत पाणी भरावे लागते, लाईट बिल आदी खर्च असतोच. त्यात दिवसाला कमवायचे 1000 रुपये पण दिवसाचा खर्च त्याहून जास्त आहे. 

साहेबराव तायडे, नाका कामगार

बरेच कामगार अनेक वर्ष नाका कामगार म्हणून काम करत आहेत. शिक्षण कमी असल्याने दुसरीकडे नोकरी करण्याचा विचार देखील त्यांनी केला नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजावेत इतके कामगार नाका कामगार म्हणून काम सोडून स्वत:चा व्यवसाय करत आहेत. मी देखील लातूरमधील अशा एका कामगाराला भेटले. 

मी मुळचा लातूरचा आहे. सात वर्षांपूर्वी मी नाका कामगार म्हणून लागलो. पण गेल्या वर्षी मी चहाचा व्यवसाय टाकला. नाका कामगार असताना हाताला काम नव्हते. गाव सोडून मुंबईत काही तरी पैसे कमवायला आलो होतो. सुरुवातीला कामं भेटायची पण हळूहळू ती पण मिळेनाशी झाली. आठ दिवसातून एकदा पैसे मिळायचे पुन्हा काम नाही. कमवलेले सगळे पैसे जात होते. नाक्यावर आले की अक्षरश: कामासाठी भीक मागावी लागायची. शेवटी हिम्मत केली आणि कर्ज घेऊन चहाचा स्टॉल टाकला. 

किशोर टेकाळे, व्यवसायक, चहा स्टॉलधारक

किशोर सध्या चहाचा स्टॉल चालवतोच. शिवाय तो अॅग्रिकल्चरमध्ये शिक्षण देखील घेत आहे. असे पाठबळ इतर कामगारांना देखील मिळावे. 

दुसरी समस्या म्हणजे, बरेच कंत्राटदार दुसऱ्या राज्यातून मुंबईत आणले जातात. जे की इथल्या कामगारांपेक्षा कमी रोजनदारीवर तयार होतात. ते त्यांच्या कुटुंबासोबतही नसतात. तर एक रुम घेतात आणि त्यात 10-15 कामगार राहतात. पण यामुळे मुळच्या इथल्या कामगारांना काम मिळत नाही, असे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये नाक्यांचे स्वरूप बदलले आहे. बांधकाम कामगारांसोबतच आता अनेक नाक्यांवर केटरिंग, साफसफाई आणि अशा इतर क्षेत्रात रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. नाका लेबर स्टँडवरील अनेक कामगार त्यांना नेमून दिलेले कोणतेही काम, मग ते स्वयंपाक, साफसफाई, मदत, लोडिंग किंवा बांधकामाचे काम करण्यासाठी तयार होतात.

कामगार आहे, तळपती तलवार आहे...’ अशा कधीकाळी घोषणा देण्यात यायची. पण आता कामगार जगत आपल्या अस्तित्त्वासाठी धडपडत आहे. एकूणच कामगार आणि कर्मचारी जगत निराशेच्या खाईत असल्याचे चित्र आहे. संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा