डेंजरस कोण ? गेम की...?

  Mumbai
  डेंजरस कोण ? गेम की...?
  मुंबई  -  

  खेळ आणि धाडस याचं अतूट नातं आहे. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी धाडसीपणा दाखवला असेलच अन्यथा त्याचं किशोरपण, तरुणपण वाया गेलं असंच म्हणावं लागेल. धाडस हा स्वभावाचा एक भागच आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांपैकी खेळ हे महत्त्वाचं माध्यम आहे. जीव धोक्यात घालण्याचं आकर्षण समस्त मानवी समाजाला त्याच्या जन्मापासूनच आहे हे आजवर आपण इतिहासापासून पाहात आणि शिकत आलो आहोत.

  घोडेस्वारीपासून गिर्यारोहणापर्यंतचे खेळ धाडसीपणाचा कसच पाहतात. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्यूजेस या उगवत्या खेळाडूचा जीव एका बाऊन्सरने घेतला आणि क्रिकेटलाही जीवघेणा खेळ म्हणावं लागलं. त्यापूर्वीही रमण लांबासारख्या खेळाडूचा मृत्यू झाला चेंडू डोक्याला लागून झाला होता. पण, सेफ्टीचे निकष न पाळल्याची चर्चा होत राहिली आणि हळूहळू सर्वजण अशा अपघातांकडे दुर्लक्ष करून जीवनाच्या खेळासोबतच हे खेळही खेळतच राहिले.

  ऑनलाइन गेम्सचं संकट

  परंतु, सध्या ऑनलाइन गेम्समुळे नवंच संकट उभं राहिलंय. शहरी भागात विशेषतः न्यूक्लिअर कुटुंबांतील मुलांसाठी हे खेळ म्हणजे ड्रग्जच्या व्यसनापेक्षा वरताण आहेत. एका बाजूला इंटरनेटमुळं जग खेडं बनलंय तर दुसरीकडे याच इंटरनेटचे दुष्परिणाम तरुणाई विशेषतः पौंगडावस्थेतील मुलांमध्ये दिसायला लागले आहेत. इंटरनेट शाप की वरदान यासारख्या फालतू वादात न पडता कोणत्याही गोष्टीचा फायदा कसा करून घेता येईल आणि त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, यावर लक्ष द्यायला हवं.


  (हेही वाचा - मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम )


  सध्या ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेममुळं पुन्हा एकदा सोशल मीडिया कसा धोकादायक, यावर चर्चांचं गुऱ्हाळ रंगतंय. अर्थात, त्यातून चांगलं निष्पन्न होत असेल तर नक्कीच घ्यावं पण केवळ चर्चा करून कितपत सुधारणा होईल, याबाबत शंकाच आहे. जोपर्यंत तुम्ही-आम्ही स्वतःला सुधारण्याचं ठरवत नाही, तोपर्यंत सारं काही फुकट आहे. आणि, सुधारण्यासाठी आपण चुकतोय हे मान्य असणंही तितकंच महत्त्वाचं नाही का? आणि तिथचं घोडं पेंड खातंय.

  आपण कधीच चुकत नसतो. चुकतात ते इतर. त्यातही जिथे समाजाचा प्रश्न उद्भवतो तिथं चुकणारं एकतर सरकार असतं किंवा समाजच चुकत असतो. सर्व गोष्टी सरकार किंवा इतरांवर सोडल्या की आपण मोकळं... बरोब्बर ना? घडलेल्या दुर्घटनेसाठी कोणाला तरी जबाबदार धरलं की बरं वाटतं. ही मानवी वृत्तीच सर्वात जास्त धोकादायक आहे.


  (हेही वाचा - 'ब्ल्यू व्हेल' गेम थांबवण्यासाठी केंद्राची मदत घेणार - मुख्यमंत्री)


  प्रत्येकाच्या आयुष्यात जीवघेण्या घटनांची, धाडसीपणाची कमतरता कधीच जाणवत नसते. पण या धाडसीपणाला सुरक्षेची एक किनार घरातूनच लाभत असते आणि ती म्हणजे संस्कार! जर योग्य संस्कार असतील तर कोणतंही संस्कारक्षम मूल कोणतीही कृती अविचारानं करणार नाही. किमान, कोणाला तरी विश्वासात घेतल्याशिवाय नक्कीच नाही. त्यामुळे, संभाव्य दुर्घटनांना बऱ्यापैकी आळा बसू शकतो. पण, आज मुलांना विश्वास वाटेल अशी व्यक्तीच आजूबाजूला नसते. त्यामुळे, ही मुले नको त्या गेम्सच्या आहारी जाणं जास्त शक्य असतं.

  ब्ल्यू व्हेलसारखा गेम जो मुळात रशियातल्या एका विकृताने आत्महत्या करण्यासाठीच बनवला, त्या गेमबद्दल आकर्षण निर्माण होणं हीच बाब खरंतर चिंतनीय आहे. आपलं मूल या गेमजवळ गेलं हे लक्षात न येणं हे त्यापेक्षा अधिक धोकादायक आणि त्यानंतर ते मूल 50 टास्क पूर्ण करण्यापर्यंत तो गेम खेळतं हे म्हणजे अनाकलनीयच!

  आता ही मुलं असे गेम्स का खेळतात, हा प्रश्न म्हणजे सिगारेट का ओढतात, दारू का पितातसारख्या प्रश्नांप्रमाणेच आहेत. या प्रश्नांच्या उत्तरचिकित्सेला अंत नाही. त्यामुळे, गेम्स का खेळतात यापेक्षा या मुलांनी कोणते गेम्स खेळावेत आणि त्याकडे त्या मुलांना कसं आकर्षित करता येईल, हे पाहिलं पाहिजे.

  काय करायला हवं?

  मुलांना गेम्सपेक्षा गरज आहे ती सहवासाची. खेळ सुद्धा सांघिक असणं जास्त गरजेचं. मात्र, आजच्या धावत्या युगात आपण तिथंच कमी पडतोय. जसे कामांचं वेळापत्रक असतं ना, तसंच आता कुटुंबासाठीही वेळापत्रक ठरवा. मुलांना, घरच्यांना ठरवून वेळ द्या. मुलांचंही वेळापत्रक तसंच ठरवा. त्यांनाही अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ द्यायला लावा. त्यांचे छंद जोपासा. त्यांच्याशी पालकांप्रमाणेच ठराविक पद्धतीने संवाद साधा. आवश्यक वाटलं तर त्यासाठी स्वतःचं काऊन्सिलिंग करवून घ्या. मुलांना निसर्गाशी गट्टी करायला लावा. सुट्टीचा दिवस ठरवून एकत्र घालवा किंवा किमान नियोजन तरी करा.

  मोबाईलला बनवा मित्र!

  मोबाईलसारखी साधनं आज नाकारणं कठीण झालंय. परंतु, त्याची सकारात्मक बाजूही लक्षात घ्या. मोबाईल फोटो, व्हिडिओजच्या विविध ऑनलाइन स्पर्धा होतात, त्यात सहभागी होण्यासाठी मुलांना प्रवृत्त करा. मोबाईलची माहिती जेवढी मुलांना आहे तेवढी तुम्हालाही नाही. त्यांच्याकडूनच अनेक गोष्टी शिका. नवनवी अॅप्स त्यांच्याकडून शिकून स्वतः वापरून त्यावर चर्चा करा. आता पूर्ण जग मोबाईलच्या, कॉम्प्युटरच्या माध्यमातून मुठीत आलंय. त्याचा वापर करून स्वतःचंही ज्ञान वाढवा. मुलांच्या आवडीनुसार विषय ठरवून त्यावर संशोधन करा.

  बघा, तुमच्या मुलांना असल्या ऑनलाइन गेम्सचं सोडाच पण इतरही कुठल्या व्यसनांची गरज भासणार नाही. एकटेपणा तर दूरच, पण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा करावीशी वाटणं, हाच तुमचा विजय असेल आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वाईट बाजूचा पराभव!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.