Advertisement

तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिलं निवारा केंद्र कल्याणमध्ये सुरू

तृतीयपंथीयासाठी मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या 'किन्नर अस्मिता' संस्थेकडून हे केंद्र चालविलं जाणार आहे.

तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिलं निवारा केंद्र कल्याणमध्ये सुरू
SHARES

रस्त्यात, लोकल ट्रेनमध्ये तसंच सिग्नलवर उभे राहून पैसे मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयासाठी (transgender) महाराष्ट्रातील पहिलं निवारा केंद्र (shelter) कल्याणमध्ये (Kalyan) सुरु करण्यात आले आहे. कल्याण मलंग गड रोडवरील तमन्ना रेसिडन्सी या इमारतीमधील तिसर्‍या आणि चौथ्या माळ्यावर हे गरिमा केंद्र आहे. या केंद्रासाठी केंद्र सरकारने निधी दिला आहे. 

तृतीयपंथीयासाठी मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या 'किन्नर अस्मिता' संस्थेकडून हे केंद्र चालविलं जाणार आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या संस्थापिका नीता केणे यांनी याबाबत सांगितलं की, समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तृतीयपंथीयांना उदर निर्वाहाचं कोणतंही साधन नसल्याने त्यांना भीक मागावी लागते. नृत्य करून इतरांचे मनोरंजन करावे लागते किंवा शरीर विक्रय व्यवसाय करावा लागतो. त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवारा केंद्राची संकल्पना राबविली आहे.

तृतीयपंथीयांना हक्काचा निवारा देण्यासाठी ४० हजार रुपये मासिक भाड्यावर असलेल्या या जागेत २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेच्या निवारा केंद्रात राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तृतीयपंथीयांची संपूर्ण माहिती घेत त्यांना या निवारा केंद्रात आश्रय दिला जाणार आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसंच आरोग्य तपासणीची व्यवस्था केंद्रात केली जाणार आहे.

या केंद्रात तृतीयपंथीयांना शिक्षणासह कौशल्यविकासाचे अभ्यासक्रमही शिकवले जाणार आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देत उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देण्याचा प्रयत्नदेखील 'किन्नर अस्मिता' संस्थेकडून केला जाणार आहे.

इतर राज्यात तृतीयपंथीयांना शिक्षणासाठी, रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जात असून पेन्शन दिली जाते. मात्र महाराष्ट्रात हा समाज उपेक्षित राहिला असून सरकारने इतरांप्रमाणेच तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी नीता केणे यांनी त्यांनी केली आहे.

या गरिमा होमच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयानी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारच्या निवासाची व्यवस्था झाल्याबद्दल त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.



हेही वाचा - 

मुंबईच्या चौपाट्यांवर पोलिसांची आता ‘एटीव्ही’वरून गस्त

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा