Advertisement

Exclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल

अवघ्या ५ वर्षांची असताना मिताली एका दुर्घटनेत भाजली होती. तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर भाजल्याचे व्रण आहेत. पण या परिस्थितीतही मितालीनं हिम्मत हारली नाही. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर तिनं मॉ़डलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं.

Exclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल
SHARES

मॉडेल म्हटलं की डोळ्यासमोर एक सुंदर आणि आकर्षक अशी छबी तयार होते. आकर्षक चेहरापट्टी, धारदार नाक, बोलके आणि पाणीदार डोळे, सुडौल बांधा, जिरो साईज फिगर आणि सौंदर्यानं परिपूर्ण अशा तरूणीची प्रतिकृती प्रत्येकाच्या मनात घर करून असते. पण मॉडेलिंगच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतिकांना तडा देत सौंदर्याची नवीन प्रतिकृती जगासमोर मांडण्याचं धाडस मॉडेल मिताली सोनावणेनं केलंय.


अवघ्या ५ वर्षांची असताना मिताली एका दुर्घटनेत भाजली होती. तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर भाजल्याचे व्रण आहेत. पण या परिस्थितीतही मितालीनं हिम्मत हारली नाही. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर तिनं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्या दुर्घटनेनंतर व्रण, जखमा चेहरा आणि शरीरावर घेऊन वावरणारी पहिली मॉडेल असा मान तिला मिळाला आणि याचा तिला अभिमान आहे.


स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष

मॉडेलिंग क्षेत्रात वावरायचं असेल तर सुंदर आणि आकर्षक दिसलंच पाहिजे, असा एक सर्वसामान्यांचा दृष्टीकोन असतो. पण मितालीनं याच विचारसारणीला फाटा देत मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेतला नाही तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं संघर्ष केला आहे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणार हे कळल्यावर अनेकांनी तिला हिणवलं. मॉडेलिंग हे काही तुझ्यासारख्या मुलीचं क्षेत्र नाही, असे कपडे तुला शोभणार नाहीत असं हिणावून सांगणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तिनं मॉडेलिंग क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


हारली नाही हिम्मत

४-५ वर्षांची असल्यापासून मितालीला डान्सची आवड होती. पण ५ वर्षांची असताना गरम पाणी पडल्यामुळे तिचा चेहरा आणि शरीर भाजले.  गंभीर स्वरूपात भाजल्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात उपचारादरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यानं तिला इनफेक्शन झालं. इनफेक्शनमुळं मिताली १० दिवस कोमात होती. डॉक्टरांनादेखील मिताली वाचेल याची आशा नव्हती. पण त्या परिस्थितीतही तिची जगण्याची इच्छा जबरदस्त होती. हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली. जवळपास १० दिवसांनी ती कोमातून बाहेर आली.


कोमातून बाहेर आल्यावर जेव्हा मी स्वत:चा चेहरा पाहिला तेव्हा मला कसलं दु:ख नाही झालं. एकप्रकारे देवानं मला जीवनदान दिलं होतं. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही मी जिवंत आहे, याचं मला समाधान होतं. त्यामुळे जेव्हा मी आरशात स्वत:चा चेहरा पाहिला तेव्हा फक्त एक स्माईल दिली. तेव्हा स्वत:ला मी एक वचन दिलं की, आयुष्यात काहीही झालं तरी हार मानणार नाही. आणि स्वत:ला दिलेलं हे वचन मी आजतागायत निभावत आहे.

- मिताली सोनावणे, मॉडल


'अशी' झाली मॉडेलिंगची आवड

जवळपास पाच-सहा महिने मितालीवर उपचार सुरू होते. शरीरावर आणि चेहऱ्यावर भाजल्याचे व्रण होते. पण त्याही परिस्थितीत तिनं आवड म्हणून डान्स क्लास लावला. शाळेत जायला देखील मिताली घाबरत होती. आपलं हे रूप पाहून आपल्याला चिडवतील, अशी भिती तिच्या मनात होती. पण शाळेत जाताच मितालीची ही भिती देखील दूर झाली. तिची कुणी मस्करी उडवली नाही. तर उलट मित्र-मैत्रिणींनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी तिला मदत केली. यामुळे तिच्या आत्मविश्वासात अधिक भर पडली.

मिताली शाळेतल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागली. हळूहळू कला, अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात तिला आवड निर्माण झाली आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय तिनं घेतला. कॉलेजमध्ये गेल्यावर तिनं रॅम्प वॉक आणि इतर कार्यक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये तिनं पहिल्यांदा रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं.


माझ्या यशामागे माझ्या कुटुंबियांचा देखील हात आहे. आई, बाबा, बहीण आणि इतर नातेवाईक माझ्या पाठिशी उभे होते आणि आजही आहेत. त्यांची साथ होती म्हणून मी आज या क्षेत्रात यश संपादन करू शकले.

- मिताली सोनावणे, मॉडेल


मुंबईची सुकन्या ते मिस इंडिया...

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मितालीनं २०१७ साली 'मुंबईची सुकन्या' या स्पर्धेत सहभाग घेतला. मुंबईची सुकन्या हा एक रिअॅलिटी शो आहे. डान्स, अभिनय आणि मॉडेलिंग या तीन गोष्टींवर हा शो आधारीत होता. मिताली या तिन्ही कलांमध्ये पारंगत होती. त्यामुळे तिनं यात सहभाग घेतला.  त्यानंतर मितालीनं २०१७ मध्ये 'मिस डिवा'मध्ये सहभाग घेतला. पहिल्या राऊंड दरम्यान शरीरावर डाग असूनही मितालीनं बिकनी घालण्याचं धाडस केलं होतं. मितालीचं धाडस आणि हजरजबाबीपणामुळे जजेसनं तिचं कौतुक केलं. पण काही कारणास्तव मितालीची निवड झाली नाही.

मितालीनं हार न मानता २०१८ साली 'मिस टियारा' या स्पर्धेत सहभाग घेतला. पण तिथंही तिची निवड होऊ शकली नाही. निराश न होता मितालीनं 'मिस इंडिया' या पुढच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. यासाठी ती खास प्रशिक्षणही घेत आहे. फक्त एवढंच नाही तर काही नावाजलेल्या ब्रँडसाठी मिताली मॉडेलिंग देखील करतेय.


'मी आतून सुंदर आहे'

अनेकजण आजही तिच्या चेहऱ्यावरील व्रण पाहून नाकं मुरडतात. काहींनी तर तिला पूर्ण झाकलेले कपडे घाल किंवा स्वत:चा चेहरा झाकण्याचा सल्ला देखील दिला. पण मितालीनं नेहमीच त्यांच्याकडं दुर्लक्ष केलंय. फक्त बाहेरून सुंदर असणं गरजेचं नाही. तुम्ही आतून किती सुंदर आहात हे महत्त्वाचं आहे, हेच मानणाऱ्यांपैकी मिताली आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याची फिकीर तिनं कधीच केली नाही.


'स्वत:वर विश्वास ठेवा'

अॅसिड हल्ला किंवा एखाद्या दुर्घटनेतील पिडीत तरूणींनी कुठल्याही परिस्थितीत हिंमत हारू नका, असा सल्ला मितीलीनं दिलाय. स्वत:वर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं येणाऱ्या समस्यांचा सामना करा. कदाचित माझी स्टोरी तुम्हाला जगण्याची नवीन उमेद आणि नवी दिशा देईल, हे सांगायला मिताली विसरली नाही.



हेही वाचा

महिलांना संगीत शिकवण्याचा वसा घेतलेली श्रृती पाठक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा