महाराष्ट्र पोलीसांतर्फे मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आलं आहे.

SHARE

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आलं आहे. गेट वे आॅफ इंडिया ते वांद्रे सी लिंक मार्गापर्यंत या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच, या मॅरेथॉनचं पहिल्यांदाच देशात पोलिसांमार्फत आयोजन करण्यात येत आहे. त्या संदर्भातील वेबसाइटचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं आहे.

पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा, या दृष्टीनं या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आॅनलाइन नोंदणी करावी. तसंच, नागरिकांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

गेट वे आॅफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही मॅरेथॉन असणार आहे. स्वास्थ्यदायी दौड अशी या मॅरेथॉनची संकल्पना आहे. ही मॅरेथॉन ४२ किलोमीटर, २१ किलोमीटर, १० मैल व ५ किलोमीटर या प्रकारांमध्ये होणार आहे. धावपटूंना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये भारतभरातून, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे १५ हजार धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

मॅरेथॉनमध्ये ५ हजार पोलीस सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. मॅरेथॉनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी २ फेब्रुवारीला १८ वर्षांवरील ३०० सायकलपटूंच्या सहभागानं पनवेल, कल्याण, मीरा-भार्इंदर येथून कुलाबा येथील पोलीस मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येणार आहे. तसंच, ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता महिलांची शक्ती आणि सुरक्षितता याचा संदेश देत, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला दौडचेही आयोजन करण्यात येणार आहे.

स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस, सुदृढ पोलीस या दृष्टीनं मॅरेथोनचं आयोजन करण्यात आलं असून, यातून जनतेला निरोगी आरोग्यासाठी मॅरेथॉनचं महत्त्व पटवून देता येणार आहे, असं पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी म्हटलं.

मॅरेथॉनपूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव वा क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातील २ हजार फिजिओथेरपिस्ट, तसेच ३०० होमिओपॅथीस्ट, आहारतज्ज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमधील सहभागींना उपलब्ध करून दिली आहे. पोलीस मुख्यालयात मॅरेथॉनसंदर्भातील जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.हेही वाचा -

दक्षिण मुंबईतून थेट मुलंडपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून प्रवास

मुंबईतील किमान तापमान १५ अंशाच्या खालीसंबंधित विषय
ताज्या बातम्या