Advertisement

दक्षिण मुंबईतून थेट मुलंडपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून प्रवास

मुंबईसह उपनगरातील प्रवाशांना दक्षिण मुंबईतून थेट मुलंडपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून प्रवास करता येणार आहे.

दक्षिण मुंबईतून थेट मुलंडपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून प्रवास
SHARES

मुंबईसह उपनगरातील प्रवाशांना दक्षिण मुंबईतून थेट मुलंडपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून प्रवास करता येणार आहे. यासाठी मानखुर्द येथे संपणारा हा 'ईस्टर्न फ्री वे'चा विस्तार मुलुंडपर्यंत आणि दक्षिणेला जीपीओपर्यंत करण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो रोड येथून सुरू होणाऱ्या फ्री वेवरून अवघ्या २० मिनिटांत चेंबूरपर्यंत पोहोचता येते.

मुंबईतील प्रवाशांना मानखुर्दपर्यंत 'ईस्टर्न फ्री वे'वरून सुसाट प्रवास करता येतो. परंतु, त्यापुढे म्हणजे ठाण्यापर्यंत जाणाऱ्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी फ्री वेचा विस्तार करण्याची सूचना करण्यात आली आहे. मंगळवारी शिंदे यांनी मंत्रालयात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी एमएमआरडीएचे आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

'ईस्टर्न फ्री वे'वरील सुसाट असला तरी, सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटी परिसरातून फ्री वेपर्यंत पोहोचायलाच किमान २५ मिनिटं लागतात. त्यामुळं चेंबूरपर्यंतचा प्रवास जलदगतीनं होत असला तरी फ्री वे गाठण्यासाठीच खूप वेळ जातो. सकाळी देखील फ्री वे संपल्यानंतर सीएसएमटी परिसरात येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसंच, ठाण्यातून जाणारा महामार्ग, तसंच घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी साकेत-गायमुख कोस्टल रस्त्याचे नियोजन असून हा रस्ता एमएमआरडीएनं करावा आणि विस्तारित फ्री वे या रस्त्याला जोडावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरचं काम सरकार प्राधान्यानं हाती घेणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. या कॉरिडोरसाठी १०४ पैकी ५५ गावांमध्ये सर्व्हेचं काम पूर्ण झालं असून, समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात येणार आहे. ठाण्यातील तीन हात नाका इथं होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे.

मेट्रो ८ मार्ग मुंबई व नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारा असून, तो सन २०२६च्या आधीच पूर्ण होणं गरजेचं आहे. नवी मुंबई येथील विमानतळाचं काम त्याच्या बऱ्याच आधी पूर्ण होणार आहे. त्यामुळं या मार्गिकेचं काम २०२६च्या आधी पूर्ण करण्यासाठी पावलं उचलण्याची सूचनाही त्यांनी केली.



हेही वाचा -

मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ

‘तान्हाजी’ करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा