Advertisement

नॅशनल क्रिकेट क्लबला विजेतेपद


नॅशनल क्रिकेट क्लबला विजेतेपद
SHARES

शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या 'विजय मांजरेकर-रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट टुर्नामेंट'चा अंतिम सामना रविवारी पय्याडे स्पोर्ट्स क्लब आणि नॅशनल क्रिकेट क्लब यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नॅशनल क्रिकेट क्लब संघाने पय्याडे स्पोर्ट्स क्लबला अवघ्या 2 धावांनी मात देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नॅशनल क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांंत 7 बाद 168 धावा फटकावल्या. अंजिक्य बेलोसे याने 30 चेंडूत 51 धावा करून संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पय्याडे स्पोर्ट्स क्लब संघाला 20 षटकांत 8 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. पय्याडे क्लब संघाकडून फलंदाज सागर मिश्रा याने नाबाद 59 धावा केल्या. परंतु त्याला संघाला अपेक्षित विजय मिळवून देता आला नाही.

विजेत्या नॅशनल क्रिकेट क्लब संघाचा 1 लाख रुपये आणि ट्रॉफी देउन सत्कार करण्यात आला. उपविजेत्या पय्याडे स्पोर्ट्स क्लब संघाचा 50 हजार रुपये आणि ट्रॉफी देउन सत्कार करण्यात आला. मालिकावीर म्हणून अरुण यादव याला 5 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज अमन खान, उत्कृष्ट गोलंदाज अत्तार शेख आणि सामनावीर अजिंक्य बेलोसे यांना प्रत्येकी 3 हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरणावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम लिमये (मेंबर ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी, बीसीसीआय), शिवाजी पार्क जिमखान्याचे ट्रस्टी मिलिंद सबनीस, रमाकांत देसाई यांचे चिरंजीव अमोक देसाई, जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर आणि असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन हेही उपस्थित होते. संजीव खानोलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

माझ्यासाठी हा विशेष आनंदाचा क्षण आहे. कारण विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई या महान क्रिकेटपटूंचे शिवाजी पार्क जिमखाना आणि देशाला दिलेल्या क्रिकेट खेळाचे योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेस मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.माझ्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे. शिवाजी पार्क जिमखाना हे माझे पहिले घर आहे, असे मी मानतो.

विक्रम लिमये, प्रशासक समिती सदस्य, बीसीसीआय 

जिमखान्याचे कार्याध्यक्ष अविनाश कामत यांच्या हस्ते विक्रम लिमये यांचा गौरव करण्यात आला. उपकार्याध्यक्ष दीपक मुरकर यांच्या हस्ते ज्येष्ठ क्रिकेटपटू जयवंत जूकर, सुहास कद्रेकर आणि रमाकांत देसाई यांचे भाऊ सुरेश देसाई यांचा गौरव करण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा