Advertisement

'मुंबई श्री'वर सुजल पिळणकरचा कब्जा


'मुंबई श्री'वर सुजल पिळणकरचा कब्जा
SHARES

मुंबईकरांना एकापेक्षा एक सरस शरीससौष्ठवपटूंच्या पिळदार देहसंपदेचा थरार पुन्हा एकदा अनुभवता अाला. बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने युवासेना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने अायोजित केलेल्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने मुंबई श्री किताबावर कब्जा केला. फॉर्च्युन फिटनेसचा सकिंदर सिंग आणि आरएम भट जिमच्या सुशांत रांजणकर यांच्यावर मात करत सुजल पिळणकरने मुंबई श्री किताबावर नाव कोरले. फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.


हे ठरले गटविजेते


५५ किलो वजनी गटात संदेश सकपाळने गत गटविजेत्या नितीन शिगवणला मागे टाकले. ६० किलो आणि ६५ किलो वजनी गटात विनायक गोळेकर आणि प्रतिक पांचाळने यश संपादले. ७० किलो वजनी गटात विघ्नेश पंडित सरस ठरला. ७५ किलो वजनी गटात रोहन गुरवला धक्का देत आरकेएमचा सुशील मुरकरने बाजी मारली. ८० किलो वजनी गटातही आरकेएमच्या सुशांत रांजणकरने अव्वल स्थान संपादन केले. ८५ किलो वजनी गटात सुजल पिळणकरच्या कामगिरीपुढे सारेच फिके पडले. रसेल दिब्रिटो, अनिकेत देसाई, स्वप्निल मांडवकरची मात्रा चालली नाही. शेवटच्या दोन गटात सकिंदर आणि श्रीदीप गावडेने अव्वल स्थान पटकावले. पण हे दोघेही चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत सुजलसमोर कमी पडले.


सुजलला हवं नोकरीचं बळ

गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या सुजल पिळणकरला आपणच मुंबई श्री जिंकणार, हा विश्वास होता आणि त्याने तो खरा करूनही दाखवला. गेले सात वर्षे व्यायामशाळेत घाम गाळणाऱ्या सुजलला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मुंबई श्रीपाठोपाठ अाता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्री स्पर्धेतही चांगली कामगिरी करायचीय. पण जोपर्यंत माझ्या मेहनतीला बळ आणि प्रोत्साहन देणारी मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी स्वतःला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. शरीरसौष्ठवात सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं घेता येत नाही. शरीरसौष्ठवासाठी पैशाचं ऑक्सिजन लागते. नोकरी लागली तरच मला ते मिळू शकेल, अशी खंत त्याने बोलून दाखवली.


हेही वाचा -

'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं

महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा