Advertisement

13 कोटी वर्षांपूर्वी अंतराळात घडलेला 'गोल्ड रश'!

१३ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेतून निर्माण झालेल्या लाटांनी पृथ्वीवरील सेन्सर्सना १७ ऑगस्ट २०१७ ला धडक दिली आणि वैज्ञानिकांना एका नव्या वैश्विक घटनेकडे बघण्याची संधी दिली. एन.जी.सी. ४९९३ या आकाशगंगेमध्ये असलेल्या दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींनी लिगोच्या प्रयोगशाळेत वर्णी लावल्यानंतर जगातील हबलसकट सर्व दुर्बिणींनी मोकळ्या आकाशातील या लहरींच्या स्त्रोताचा शोध घेतला. जे सापडलं, ते अद्भुत होतं.

13 कोटी वर्षांपूर्वी अंतराळात घडलेला 'गोल्ड रश'!
SHARES

पृथ्वीवर डायनोसॉर राज्य करत असताना १३० मिलियन म्हणजेच १३ कोटी वर्षांपूर्वी एक वैश्विक घटना घडली. दोन मृत झालेल्या ताऱ्यांची टक्कर! या टकरीमधून स्पेस-टाईममध्ये लाटा निर्माण झाल्या. १३० मिलियन वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेतून निर्माण झालेल्या लाटांनी पृथ्वीवरील सेन्सर्सना १७ ऑगस्ट २०१७ ला धडक दिली आणि वैज्ञानिकांना एका नव्या वैश्विक घटनेकडे बघण्याची संधी दिली.

एन.जी.सी. ४९९३ या आकाशगंगेमध्ये असलेल्या दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींनी लिगोच्या प्रयोगशाळेत वर्णी लावल्यानंतर जगातील हबलसकट सर्व दुर्बिणींनी मोकळ्या आकाशातील या लहरींच्या स्त्रोताचा शोध घेऊन ही घटना आपल्या दुर्बिणीतून बघण्याची संधी जगातील वैज्ञानिकांना दिली.


'न्युट्रॉन तारे' म्हणजे काय?

'न्युट्रॉन तारे' म्हणजे काय? हे आधी समजून घेऊ. न्युट्रॉन तारे हे अवकाशातील सगळ्यात छोटे पण त्याच वेळी प्रचंड वस्तुमान असलेले तारे असतात. जेव्हा प्रचंड वस्तुमानाचा तारा सुपरनोव्हा बनून त्याचा स्फोट होतो, तेव्हा त्यातून न्युट्रॉन ताऱ्याचा जन्म होतो. सूर्यापेक्षा जास्त वजनाचे असूनसुद्धा या ताऱ्यांचा व्यास फक्त २० किलोमीटर इतकाच असतो. एका चमचाएवढ्या न्युट्रॉन ताऱ्याच्या सामुग्रीचं वजन माउंट एव्हरेस्टच्या वजनापेक्षा जास्त भरेल. सूर्याच्या १.१ ते १.६ पट वस्तुमान असणाऱ्या या दोन ताऱ्यांना एकेमकांशी टक्कर होण्याआधी १०० सेकंद वैज्ञानिकांनी या दोन्ही ताऱ्यांना त्यांच्या शेवटच्या लीला करताना बघितलं. आणि, त्यानंतर या दोघांची टक्कर!


त्यांनी जे टिपलं ते अद्भुत होतं!

१७ ऑगस्टच्या सकाळी हानफोर्ड येथील स्वयंचलित गजर वाजल्यानंतर लुईझियाना आणि वॉशिंग्टन येथील एन्टिना यांनी जात असलेल्या गुरुत्वीय लाटेचं अस्तित्व सिद्ध केलं. याचवेळी दोन सेकंदानंतर नासाच्या फर्मी टेलिस्कोपने गॅमा रेच्या स्फोटाची नोंद केली. या नोंदीनंतर जगातील सर्व दुर्बिणी एन. जी. सी. ४९९३कडे फिरवण्यात आल्या. त्यानंतर जे टिपलं ते अद्भुत होतं!



अशा टकरीमधून जन्माला येतात ती विश्वाची मूलद्रव्य. मोठा अणुक्रमांक असणारी मूलद्रव्य म्हणजे सोनं, चांदी, प्लॅटिनियम, युरेनियम तयार होतात. म्हणूनच या घटनेला 'गोल्ड रश' असं म्हटलं जातं. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी भाकित केलं होतं, कि 'जेव्हा वैश्विक घटना, म्हणजेच कृष्णविवरांचं मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अशा घटना घडतील, तेव्हा स्पेस-टाईममध्ये विश्व जेलीच्या बॉल सारखं आकुंचन आणि प्रसरण पावेल'. ते ज्या लहरींनी होईल, त्यांना 'गुरुत्वीय लहरी' असं म्हटलं गेलं. 

या लहरींचं अस्तित्व २०१६मध्ये पहिल्यांदा 'लिगो' म्हणजेच Laser Interferometer Gravitational-Wave Observatory ने सप्रमाण सिद्ध केलं. ज्यावेळी 'लिगो'ने दोन प्रचंड मोठ्या कृष्णविवरांची टक्कर सिद्ध केली, त्याच संशोधनासाठी या वर्षी त्या वैज्ञानिकांना विज्ञानातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजला जाणारा 'नोबेल पुरस्कार' मिळाला. पण कृष्णविवरामधून काहीच बाहेर येत नसल्याने, इतर वैज्ञानिकांना काहीच बघता येत नव्हतं.


१३ कोटी वर्षांपूर्वीच्या लहरी आत्ता पृथ्वीवर आदळल्या!

पण या वेळी घटना वेगळी होती. तब्बल १३० मिलियन वर्षांपूर्वीचा इतिहास घेऊन जेव्हा गुरुत्वीय लहर पृथ्वीवर आदळली, तेव्हा 'लिगो'ने काहीतरी अद्भुत होणार आहे, याची चाहूल दिली. न्युट्रॉन ताऱ्यांच्या टकरीमधून खूप काही बाहेर पडतं. गॅमा रे, एक्स रे, रेडिओ वेव्ह हे सगळं टिपण्यासाठी नासा, तसेच इतर संस्थांचे अनेक उपग्रह अवकाशात ठाण मांडून आहेत. 'लिगो'च्या सोबत जेव्हा नासाच्या फर्मी टेलिस्कोपने आपला गजर वाजवला, तेव्हा वैज्ञानिकांची एकच पळापळ सुरु झाली. गेल्या कित्येक शतकांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार या खुशीने वैज्ञानिक आनंदित झाले. आणि अर्थात, त्यानंतर जे काही समोर आलं, ते अविश्वसनीय असं होतं! त्यांच्या भाषेत अवकाशातील गोल्ड रश!


...आणि अल्बर्ट आईनस्टाईन पुन्हा बरोबर सिद्ध झाला!

या संशोधनातून वैज्ञानिकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यास मदत झाली आहे. पाहिलं हे कि अल्बर्ट आईनस्टाईननी सांगितल्याप्रमाणे गुरुत्वीय लहरीही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात हे सिद्ध झालं. 'लिगो' आणि 'फर्मी टेलिस्कोप' हे वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर काम करतात. ज्यावेळी 'फर्मी टेलिस्कोप'ला कळलं त्याच्या २ सेकंद आधी 'लिगो'ला कळालं. म्हणजेच या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पृथ्वीवर आल्या व मोजल्या गेल्या. या संशोधनाने दोन वेगवेगळ्या पद्धतीने विश्वाचं प्रसरण मोजण्याचं साधन वैज्ञानिकांना गवसलं.

'लिगो'ने दिलेल्या वर्दीमुळे जगातील दुर्बिणी या घटनेच्या दिशेने वळवून त्याचा शोध घेतला गेला. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्रा-व्हायलेट, इन्फ्रारेड, रेडिओ वेव्हचा अभ्यास केला गेला. या दोन्ही वेगवेगळ्या संशोधनातून हे सिद्ध झालं, कि अवकाशात होणारे छोटे गॅमा रेचे स्फोट बहुतांश वेळा न्युट्रॉन ताऱ्यांच्या टकरीमुळे होतात. तसेच, या टकरीच जगातील सगळ्यात महाग असणाऱ्या सोनं, चांदी, युरेनियम अशा मूलद्रव्यांचं जन्मस्थान असतं.



सामान्य माणसाच्या दृष्टीने ही घटना तितकीशी महत्वाची नसली, तरी अशा किरकोळ घटनांमधून मोठे प्रश्न सुटत असतात. हे विश्व किती मोठं आहे? आता किती वेगाने आपण दूर जात आहोत? आपण एकटेच का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मानव कित्येक शतकं शोधतो आहे. न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर ही नेहमी होणारी आणि दिसणारी घटना नाही. सामान्य माणसाने हा विचार एकदा नक्कीच करावा कि आपण १३० मिलियन वर्षांअगोदरच्या काळात डोकावून बघू शकत आहोत. भूतकाळात बघण्याची संधी आपण नेहमीच शोधत असतो. पण आज विश्व ती आपल्याला देत आहे. 

आज आपल्याकडे ते टिपण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अनेक शतकं पडलेल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन गुरुत्वीय लहरी आणि अवकाशातील घटना आपल्यासमोर सोन्याचा खजिना किंवा अलिबाबाची गुहा म्हणा, उघडी केली असताना जर आपण 'गोल्ड रश' केली नाही, तर आपणच मूर्ख ठरू! म्हणूनच १७ ऑगस्ट २०१७ ची घटना सगळ्याच खगोल वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, अभियंते आणि खगोल प्रेमींसाठी 'गोल्ड रश' आहे!



हेही वाचा

पृथ्वीचं आर्मागेडन झालं तर?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा