Advertisement

पृथ्वीचं आर्मागेडन झालं तर?

पृथ्वीचं आर्मागेडन व्हायला साधारण ९० किमीचा अशनी पुरेसा आहे. या धडकेने पूर्ण पृथ्वीचा विनाश होईल, असं संशोधकांना वाटतं. एक मिलियन लघुग्रह आपल्याला अजून ज्ञात नाहीत. त्यांच्या कक्षेविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही. मग असा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या मार्गातून जाताना आपली पृथ्वी नेमकी तिथे आली तर?

पृथ्वीचं आर्मागेडन झालं तर?
SHARES

'आर्मागेडन' हा शब्द आपल्याला अपरिचित असला तरी १९९८ साली आलेल्या ब्रूस विलीसच्या चित्रपटाच्या नावाने आपल्याला ज्ञात असेल. 'आर्मागेडन' हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ होतो जगाचा विनाश! जगाचा विनाश जर कोणत्या गोष्टीने होणार असेल, तर सगळ्यात जास्त शक्यता आहे ती अशनीच्या आघातामुळे.


उल्का आणि अशनी

उल्का, ज्या आपल्याला आकाशातून पडताना दिसतात, पण पृथ्वीच्या वातावरणात नष्ट होतात. पण अशनी म्हणजे ज्या उल्का पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर अथवा पाण्यात पडतात. तूर्तास असाच एक मोठा लघुग्रह साधारण घराच्या आकाराचा म्हणजे १५-३० मीटर लांबीचा पृथ्वीपासून ४४,००० किमीहून कमी अंतरावरून गुरुवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी जाणार आहे. आपल्याला हे अंतर जास्त वाटलं, तरी ते विज्ञानाच्या मानाने खूप कमी आहे. जगातील शेकडो दूरसंचार उपग्रह पृथ्वीपासून ३६,००० किमी अंतरावर फिरत असतात. त्यामुळे हे अंतर किती कमी आहे? याचा अंदाज आपल्याला येईल.


कुणासोबत होणार पृथ्वीचं 'आर्मागेडन'?

'२०१२ टी.सी. ४' या नावाचा हा लघुग्रह २०१२ साली शोधण्यात आला. Panoramic Survey Telescope and Rapid Response System (Pan-STARRS) या हवाईस्थित संस्थेने हा ग्रह शोधला. मात्र शोधल्यानंतर हा लघुग्रह दिसेनासा झाला. २०१२ साली केलेल्या पाहणीवरून हा लघुग्रह पुन्हा २०१७ साली पृथ्वीच्या जवळून जाईल, असं भाकीत वर्तवलं होतं. त्याप्रमाणे गेल्या २ महिन्यांपासून नासा त्याच्या मार्गावर लक्ष ठेवून असून पृथ्वीपासून हा सुरक्षितरित्या ४४,००० किमीच्या आसपास दक्षिण ऑस्ट्रेलियामधून जाईल. पण यानिमित्ताने एक प्रश्न समोर आला आहे, तो म्हणजे पृथ्वी आणि हा लघुग्रह समोरासमोर आले तर? 'आर्मागेडन' होईल का? आणि ते झालं तर आपण काय करू शकू?


पृथ्वीचं आर्मागेडन व्हायला ९० किमीचा अशनी पुरेसा

डायनोसॉरना पृथ्वीवरून गायब करणारा अशनी फक्त एका डोंगराच्या आकाराएवढा होता. (साधारण ७ ते ८ किमी लांबी) ६४,००० किमी/तास वेगाने जेव्हा त्याने पृथ्वीला धडक दिली, तेव्हा डायनोसॉरचा आर्मागेडन होणं क्रमप्राप्त होत. एक ८०० मीटर लांबीचा अशनी जवळपास १०० बिलियन टन टी.एन.टी. (trinitrotoluene(try-night-row-TALL-you-een) इतकी ऊर्जा उत्पन करू शकतो. मग पृथ्वीचं आर्मागेडन व्हायला साधारण ९० किमीचा अशनी पुरेसा आहे. या धडकेने पूर्ण पृथ्वीचा विनाश होईल, असं संशोधकांना वाटतं. आपलं अाकाश इतकं प्रचंड आहे, कि '२०१२ टी.सी. ४' हा आपल्याला ज्ञात हजारो लघुग्रहांपैकी एक आहे. पण असे एक मिलियन लघुग्रह आपल्याला अजून ज्ञात नाहीत. त्यांच्या कक्षेविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही. मग असा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या मार्गातून जाताना आपली पृथ्वी नेमकी तिथे आली तर?


आर्मागेडन टाळण्यासाठी नासा प्रयत्नशील

नासाच्या मते निदान माहीत असलेल्या लघुग्रहांपैकी पुढल्या १०० वर्षांत त्यांच्याकडून अशा कोणत्या धडकेची शक्यता सध्या तरी नाही. पण असे कितीतरी लघुग्रह, धुमकेतू आपल्याला अजून ज्ञात नाहीत. तसेच या सगळ्यांच्या कक्षा या ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे कधीही बदलू शकतात. त्यामुळे त्यांचं आकलन सतत करत रहावं लागतं. पण तरीही, असा अनोळखी लघुग्रह जर पृथ्वीला टक्कर मारणार असेल, तर माणसांचं आर्मागेडन होऊ नये म्हणून नासाने २०१२ टी.सी. ४ या लघुग्रहाला आपलं लक्ष्य बनवलं आहे. याद्वारे नासा भविष्यातल्या अशा टकरींसाठी स्वतःला तयार करत आहे. 

या सगळ्या प्रयोगात नासासोबत जगातील सगळ्या वेधशाळा, वैज्ञानिक, प्रयोगशाळा एकत्र येऊन मानवाला इशारा देणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करणार आहेत. नासा लघुग्रहांचे मार्ग बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे नासा लघुग्रहावर यान उतरवून तिथल्या दगडांचा अभ्यास करून त्यांचा मार्ग बदलून पृथ्वीला 'आर्मागेडन'पासून वाचवेल. २०२०मध्ये हे मिशन कार्यान्वित केलं जाणं अपेक्षित आहे. त्या अगोदर अशा लघुग्रहांची कक्षा, त्यांच्यावरील वातावरण अशा सर्व बाबींचा अभ्यास आपली उपकरणं कसा करतात? यासाठी नासा या लघुग्रहाला गिनिपिग बनवून आपल्या तंत्राची चाचणी करणार आहे.


आपण कधी बदलणार?

आपण अजून आपल्यामध्येच गुंतलो आहोत. अजून आपल्या जातीवरून आपली ओळख होते. अजून आपल्या धर्मावरून आपली विचारसरणी ठरते. आपल्या त्वचेच्या रंगावरून आपण आजही काळं-गोरं करतो. माणूस म्हणून आपण जगाचा किंवा मानवता वाचवण्याचा विचार केव्हा करणार आहोत? डायनोसॉर गेले, कारण त्यांची प्रगती तेवढी नव्हती, त्यांच्याकडे तंत्रज्ञान नव्हतं. म्हणून आकाशातून अवचित येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना लागली नाही. त्या संकटात त्यांचं 'आर्मागेडन' झालं. पण आपण प्रगत आहोत, प्रगल्भ आहोत, पुढारलेलो आहोत. पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी पृथ्वीवरील सर्वात प्रगल्भ प्राणी म्हणून आपली आहे. आपल्या जाती, धर्म, रंग, देश यापलीकडे आपण माणूस म्हणून एकत्र झालो, तर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं रक्षण करू शकू. पण आपण जर आपल्या कुपमंडूक वृत्तीत अडकलो, तर मात्र आपलं 'आर्मागेडन' होण्यापासून आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही.


विनीत वर्तक यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार


Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा