Advertisement

अपयशाच्या पलीकडे...


अपयशाच्या पलीकडे...
SHARES

३१ ऑगस्ट २०१७ रोजी सलग ३९ मोहिमा यशस्वी करणाऱ्या इस्रोच्या वर्क हॉर्स पी.एस.एल.व्ही.ची मोहीम अयशस्वी झाली. मोहीम जरी अयशस्वी झाली असली तरी, रॉकेटच्या तंत्रज्ञानात कुठे गडबड झाली नव्हती. रॉकेटने आपले काम फत्ते केले होते. पण, एक तांत्रिक अडचण, जी रॉकेटच्या बांधणीत आली, त्यामुळेच या मोहिमेला अपयश चाखावे लागले.

एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपले रॉकेट नापास झाले असे आपण म्हटले तर ते खूप चुकीचे होईल. एकूणच, रॉकेट बांधणीविषयी आपण जाणून घेतले तर नक्कीच माशी कुठे शिंकली, याचा अंदाज येईल. कोणतेही रॉकेट हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये बनवले जाते. तसेच वेगवेगळ्या ज्वलनशील इंधनांचा यात उपयोग केला जातो. हे करण्यामागे कारण असते ते ज्या वातावरणात हे इंधन प्रज्वलित होणार ते वातावरण आणि त्याला वाहून न्याव्या लागणाऱ्या भाराचा यात समावेश असतो. पी.एस.एल.व्ही.च्या संदर्भात बोलायचे झाले तर यात ४ स्टेज असतात. प्रत्येक स्टेज ही आपले प्रज्वलन पूर्ण झाल्यावर रॉकेटपासून विलग होते. या स्टेजचे विलग होणे व ती संपण्याआधी त्या पुढल्या स्टेजचे प्रज्वलन होणे अत्यंत गरजेचे असते. तेव्हाच रॉकेट आपली मिळालेली गती वाढवत अवकाशात प्रवेश करते.

एक अत्यंत महत्वाची गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, प्रत्येक स्टेजचे प्रज्वलन झाल्यावर रॉकेटचे वजन/भार कमी होतो. त्यामुळे, पुढल्या स्टेजला कमी भार वाहून न्यावा लागतो. सगळ्या स्टेज पूर्ण होऊन रॉकेटने अपेक्षित उंची गाठली की उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जातो. या सगळ्या प्रक्रियांमध्ये अंतर कमी/जास्त होते. कोन आणि एकूणच उपग्रहाची जी स्थिती ठरवलेली असते आणि प्रत्यक्षात जी गाठली जाते यात तफावत असते. ही तफावत उपग्रहावरील इंजिन प्रज्वलित करून त्याला अतिशय अचूक कक्षेत आणि कोनात स्थापन केले जाते. त्यानंतर उपग्रह आपल काम सुरू करतो. हे वाचताना सोप्पे वाटले तरी अनेक किचकट प्रक्रिया या एकाच वेळी काम करत असतात. त्यामुळे यातील एक चूक पूर्ण मोहीम अयशस्वी करू शकते.गेल्या वेळी नेमकी चूक झाली कुठे?

तर, उपग्रह हा रॉकेटच्या अगदी अग्रभागात ठेवलेला असतो. रॉकेट पृथ्वीच्या वातावरणातून जोवर अवकाशात प्रवेश करत नाही तोवर पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन प्रचंड ऊर्जा निर्माण होते. यामुळे उपग्रहाच्या प्रणालीला हानी पोहोचण्याचा धोका असतो. ते होऊ नये म्हणून उपग्रहाच्या भोवती हिट शिल्ड किंवा उष्णतारोधक आवरण बसवलेले असते. साधारण जमिनीपासून १०० किमीची उंची रॉकेटने गाठली की पृथ्वीच्या वातावरणाचा अवरोध कमी होतो व ही हिट शिल्ड रॉकेटपासून विलग होणे अपेक्षित असते. पी.एस.एल.व्ही.च्या बाबतीत ही प्रक्रिया १२५ किमीवर म्हणजेच उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यावर साधारण ३ मिनिटांनी होणे अपेक्षित असते. पी.एस.एल.व्ही. सी ३९ मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे ही हिट शिल्ड विलग होऊ शकली नाही. यामुळे झाले काय की आता रॉकेटला हिट शिल्डचे अजून १००० किलोग्राम वजन अवकाशात घेऊन जावे लागत होते. यावेळेस रॉकेटच्या दुसऱ्या स्टेजचे प्रज्वलन चालू होते. पण, हिट शिल्डच्या बिघाडामुळे आणि अधिक वजनामुळे या स्टेजने अपेक्षित असलेली उंची रॉकेट गाठूच शकले नाही. पुढल्या २ स्टेजमध्ये प्रज्वलन होऊनसुद्धा रॉकेट आपल्या ध्येयापासून खूप भरकटत गेले. यामुळे ही मोहीम पूर्णतः अयशस्वी झाली.

आता हा भरकटलेला उपग्रह इस्रोच्या काळजीचे कारण बनला. कारण, पृथ्वीपासून कमी अंतरावर प्रक्षेपित झाल्याने तो हळूहळू पृथ्वीकडे खेचला जाऊन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार हे निश्चित आहे. हिट शिल्डच्या मध्ये असलेल्या उपग्रहाचे अनेक भाग पृथ्वीच्या वातावरणात शिरताना जळून नष्ट होणार असले तरी एक चिंता इस्रोला भेडसावते आहे ती म्हणजे, ज्वालाग्राही इंधनाचा साठा असणारा हा उपग्रह पृथ्वीच्या कोणत्या भागात तो पडेल? परंतु, इस्रो आय.ए.डी.सी.चा भाग आहे, त्यामुळे अमेरिकास्थित नोराड या अवकाश कचऱ्यावरवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेकडून इस्रोला मदत मिळणार आहे.गेल्या २४ वर्षांतील सलग ३९ उड्डाणांमधील हा पहिला अपघात आहे. एक चूक पण किती महागात पडू शकते हे या निमित्ताने समोर आले आहे. या उपग्रहाची किंमत (बनवून प्रक्षेपित करण्यापर्यंतची) जवळपास ४०० कोटी रुपये आहे. हे सगळे पैसे वाया गेले तरी रॉकेट तंत्रज्ञानात असे धोके ठरलेले असतात. अमेरिका असो वा चीन, रशिया असो वा जपान, सगळ्या देशांना अपयशाची चव चाखावीच लागली आहे. याउलट, भारताला अपयशाचा सामना खूप कमी वेळा करावा लागला आहे. हेच इस्रोचे वेगळेपण जगात नावाजले जाते.

या अपयशानंतर बिघाड शोधून काढून त्यावर योग्य ती उपाययोजना इस्रोने केली असून पुन्हा एकदा अवकाशाच्या स्वारीसाठी इस्रो सज्ज झाली आहे. एक भारतीय म्हणून आपण त्यांना पुढल्या मोहिमेसाठी शुभेच्छा देऊया. मला खात्री आहे की, आलेल्या अपयशातून इस्रो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेत पुन्हा एकदा आपल्या यशाची पताका जगात फडकवेल.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement