Advertisement

सुबोध करणार 'अश्रूंची फुले'!

सिद्धहस्त लेखक वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून आकाराला आलेलं 'अश्रूंची झाली फुले' हे अजरामर नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणं हे मराठी रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

सुबोध करणार 'अश्रूंची फुले'!
SHARES

'जुनं ते सोनं' असं म्हणत आजवर बरीच नाटकं पुन्हा नव्या रूपात रंगभूमीवर अवतरली आहेत. आजच्या पिढीतील रसिकांनीही या नाटकांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आहे. याच वाटेने जात आता अभिनेता सुबोध भावे 'अश्रूंची झाली फुले' हे गाजलेलं नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे.


गुढीपाडव्याचा मुहूर्त

सिद्धहस्त लेखक वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून आकाराला आलेलं 'अश्रूंची झाली फुले' हे अजरामर नाटक पुन्हा रंगभूमीवर अवतरणं हे मराठी रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या पर्वणीचा आनंद रसिकांना गुढीपाडव्यापासून म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून घेता येणार आहे. या नाटकातील गाजलेली 'लाल्या'ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुबोधने 'अश्रूंची झाली फुले' हे नाटक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रसिक दरबारी सादर करणार असल्याचं सांगितलं आहे.


५० प्रयोगाचा मानस

या नाटकाचे केवळ ५० प्रयोग महाराष्ट्रातल्या गावोगावी करण्याची इच्छा असल्याचंही सुबोधने म्हटलं आहे. या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करण्याचा आनंद उपभोगणार असल्याचं सांगत सुबोध म्हणाला की, 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाच्या निमित्ताने जवळजवळ पाच-सहा वर्षांनी पुन्हा रंगमंचावर काम करणार आहे. मागील काही वर्षांपासून वेळच नसल्याने नाटकांपासून दूर राहिलो होतो. तालीम करायला आणि प्रयोग करायला वेळ मिळत नव्हता. आताही तिच परिस्थिती असल्याने या नाटकाचे ५० प्रयोगच करण्याचा विचार केला आहे.


कलाकार कोण?

शैक्षणिक क्षेत्रासोबतच इतरत्र पसरलेला भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची होणारी गळचेपी या विषयावर हे नाटक आधारलेलं आहे. दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी १९६६ मध्ये नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आणलं होतं. २००२ पर्यंत पणशीकरांनी स्वत: या नाटकाचे ११११ प्रयोग सादर केले होते. नव्या संचातील 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात कोणते कलाकार दिसणार किंवा या नाटकाची निर्मिती-दिग्दर्शन कोण करणार, याबाबत अद्याप काहीही माहिती सांगण्यात आलेली नाही.



हेही वाचा - 

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा