Advertisement

Exclusive : प्रियाच्या 'त्या' पोस्टने केला अनेकांचा 'पोपट'

फेसबुकवर मी जेव्हा 'गुड न्यूज आहे' अशी पोस्ट टाकली, तेव्हा यात काहीतरी ट्विस्ट असणार असं काहींना वाटलं होतं, पण काहींना मात्र अपेक्षाच नव्हती. त्यामुळे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. आपल्याकडे 'गुड न्यूज' म्हणजे नवीन पाहुणा वगैरे येणार असं सर्वसाधारणपणे मानलं जातं असल्याने काही जणांना तसंही वाटलं असेल.

Exclusive : प्रियाच्या 'त्या' पोस्टने केला अनेकांचा 'पोपट'
SHARES

राजकुमार हिरानींच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या हिंदी चित्रपटांमध्ये छोटीशी भूमिका साकारल्यानंतर 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या बहुचर्चित मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारी प्रिया बापट आज खूप मोठ्या उंचीवर पोहोचली आहे. आता ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया निर्माती बनली असून, तिची निर्मिती असलेलं 'दादा, एक गुड न्यूज आहे' हे पहिलं नाटक २१ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. 

प्रिया हे नाटक सादर करीत आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम निर्माते आहेत. उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर या कलाकारांचा समावेश या नाटकात आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रियाने 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करत आपल्या नव्या प्रवासाबाबत सांगितलं.


गोष्टी जुळून आल्या...

तसं मी काहीच ठरवून करत नाही, पण लेखिका कल्याणी पाठारेने जेव्हा 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा विषय सांगितला, तेव्हा वाटलं येस हीच खरी वेळ आहे असं वाटलं. एखादा वेगळा विषय किंवा वेगळा मुद्दा मांडण्यासाठी दुसऱ्या निर्मात्याची वाट का पाहायची, आपणच पुढाकार घेत तो विषय रसिकांसमोर मांडायला काय हरकत आहे या विचारातून मी आणि उमेशने या नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आमच्या डोक्यात काहीच रॅाकेट प्लॅन नव्हता.


दोघांपैकी एकच रंगमंचावर...

या नाटकाची गोष्ट भाऊ आणि बहिणीभोवती फिरणारी आहे. त्यामुळे आम्हा दोघांपैकी एक रंगमंचावर आणि दुसरा पडद्यामागे राहणं गरजेचं होतं. या नाटकाची गोष्ट ऐकली तेव्हा उमेशच या नाटकात भाऊ साकारणार असं ठरल्याने मी बॅकस्टेजला राहून निर्मात्याची जबाबदारी सांभाळण्याचा निर्णय घेतला. जर मी बहिणीच्या भूमिकेत काम करायचं म्हटलं असतं, तर उमेशच्या जागी दुसरा नट घ्यावा लागला असता, जो माझ्यापेक्षा वयाने मोठा असण्याची गरज होती. कारण यात भाऊ थोरला आणि बहिण धाकटी आहे.


'फुलपाखरू'ने दिली ऋता

या नाटकात उमेशच्या लहान बहिणीची भूमिका ऋता दुर्गुळेने साकारली आहे. या भूमिकेसाठी ऋताच होती. हे अद्वैतकडून आलेलं सजेशन आहे. त्यापूर्वी मला तिच्याबाबत काहीही ठाऊक नव्हतं. कारण मी तिचं कामच पाहिलं नव्हतं. तिची कोणतीच मालिका पाहिली नव्हती. अद्वैतने ऋताचं नाव सुचवल्यानंतर उमेश आणि मी 'फुलपाखरू' ही मालिका बघायला लागलो. मंदारदादाच्या तालिमीत ती तयार झालेली असल्याने आमचा तिच्यावर विश्वास होता. तो तिने सार्थ ठरवला आहे.


'पोपट' झाल्याच्या प्रतिक्रिया...

फेसबुकवर मी जेव्हा 'गुड न्यूज आहे' अशी पोस्ट टाकली, तेव्हा यात काहीतरी ट्विस्ट असणार असं काहींना वाटलं होतं, पण काहींना मात्र अपेक्षाच नव्हती. त्यामुळे विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. आपल्याकडे 'गुड न्यूज' म्हणजे नवीन पाहुणा वगैरे येणार असं सर्वसाधारणपणे मानलं जातं असल्याने काही जणांना तसंही वाटलं असेल. त्यामुळे मी जेव्हा 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकाबाबत सांगितलं, तेव्हा 'आमचा पोपट झाला...' अशा आशयाच्या प्रतिक्रियाही आल्या, पण कोणीही आमच्यावर रागावलं नाही याचा आनंद आहे. सर्वांनी खूप प्रेमाने आमचं हे मार्केटिंग गिमीक आणि शब्द छल स्वीकारला.


विरोध होण्याचं कारण नाही

या नाटकाचा विषय खूप वेगळा आणि धाडसी आहे. आज काळही खूप बदलला आहे. आज सर्व नाती पारदर्शक झाली आहेत. भाऊ-बहिणीचं नातं हे जितकं प्रेमळ असतं तितकंच ते पारदर्शीही असतं. त्यामुळे एखादी बहीण आपल्या भावाला आपल्या खाजगी जीवनात घडलेल्या गोष्टीबाबत उघडपणे सांगते, तेव्हा त्यात विरोध करण्यासारखं काही उरत नाही. आजचे प्रेक्षक सुजाण आहेत. त्यामुळे हा विषयही ते खुल्या दिलाने आणि मोठ्या मनाने स्वीकारतील याची खात्री आहे.



हेही वाचा -

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...

'आयला आयला सचिन...' म्हणत आला स्वप्नील




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा