सीएसएमटी ते डोंबिवली प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता लवकरच सुखकर होणार आहे. कारण, सोमवार ४ मार्चपासून सीएसएमटी ते डोंबिवली या मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळेत १५ डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
डोंबिवलीहून सीएसएमटीच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत मागील काही महिन्यांपासून प्रचंड वाढ झाली आहे. त्यात कर्जत आणि कसारा येथून येणाऱ्या लोकल गाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं डोंबिवलीच्या प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळं लोकलमधून पडून अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डोंबिवली येथून १५ डब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीएसएमटी-डोंबिवली १५ डब्यांची लोकल सोमवारी सकाळी ६.१४ वाजेच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं रवाना होणार आहे. तर सकाळी ११.३७ वाजता सीएसएमटीहून डोंबिवलीच्या दिशेनं लोकल रवाना होणार आहे. या लोकलला ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्याशिवाय, सोमवार ते शुक्रवार २२ फेऱ्या चालविण्यात येणार असून शनिवारी १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. रविवारी ही लोकल चालवली जाणार नाही.
हेही वाचा -
आता ट्रॅफिक पोलिस थेट घरी नोटीस पाठवणार
परळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण