Advertisement

धोका कायम! ६८ प्लॅटफाॅर्मची उंची वाढण्याचं काम सुरूच

उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेणं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला भाग पडलं. तरीही हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मध्य रेल्वेवरील ६० आणि पश्चिम रेल्वेवरील ८ प्लॅटफाॅर्मची उंची अजूनही वाढलेली नाही.

धोका कायम! ६८ प्लॅटफाॅर्मची उंची वाढण्याचं काम सुरूच
SHARES

मुंबई उपनगरात रेल्वे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत सापडून होणाऱ्या अपघातात अनेक प्रवासी आपला जीव गमवत आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेणं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला भाग पडलं. तरीही हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मध्य रेल्वेवरील ६० आणि पश्चिम रेल्वेवरील ८ प्लॅटफाॅर्मची उंची अजूनही वाढलेली नाही.


किती प्लॅटफाॅर्मची उंची वाढली?

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण २७३ प्लॅटफॉर्म असून त्यापैकी ६० फलाटांची उंची वाढवण्याचं काम शिल्लक असल्याने ते अजूनही धोकादायक अवस्थेत आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या १४५ फलाटांपैकी १३७ फलांटांची उंची वाढवण्याचं काम पूर्ण झालं असून ८ फलाटांचं काम शिल्लक असल्याची माहिती, 'माहिती अधिकारा' अंतर्गत समोर झाली आहे.कुठल्या स्थानकांचा समावेश

आरटीआय कार्यकर्ते प्रतीक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या हद्दीतील ७५ स्थानकातील ६० प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम अजूनही सुरू आहे. यामध्ये हार्बरच्या गोवंडी, चेंबूर तर ट्रान्सहार्बरच्या ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे तर मुख्य मार्गावरील मस्जिद, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहाड, टिटवाळा, शेलू, नेरुळ, कर्जत, खोपोली, केळवली, डोलवली आदी स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचं काम प्रगतीपथावर आहे.


पश्चिम रेल्वे मार्गाची काय स्थिती?

तर, पश्चिम रेल्वेच्या केवळ ८ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम शिल्लक असून त्यातील ४ प्लॅटफॉर्मचं काम प्रगतीपथावर आहे. तसंच, एक प्लॅटफॉर्म वापरात नसल्याने तो नष्ट करण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील ५ आणि ६ व्या मार्गिकेचं काम होणार आहे, तेथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम नंतर करण्यात येणार आहे. माटुंगा, शीव, परळ स्थानकांत ५ आणि ६ व्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतरच येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे.


कधी दिले होते निर्देश

घाटकोपर रेल्वे स्थानकात मोनिका मोरे या १६ वर्षांच्या मुलीचा ११ जानेवारी २०१४ रोजी प्लॅटफाॅर्म आणि रेल्वेतील पोकळीत सापडून अपघात झाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने सुओमोटो याचिका दाखल करून घेत सर्व रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफाॅर्मची उंची सध्याच्या उंचीपेक्षा ९२० मिमीने वाढवण्याचे निर्देश दिले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१५ ची डेडलाईन देखील आखून दिली होती.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा