Advertisement

उन्हाळ्यात एसी लोकल फुल्ल, रेल्वे प्रशासन झालं खूश

दररोज एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत दुप्पट गर्दी एसी लोकलमध्ये दिसून येत आहे.

उन्हाळ्यात एसी लोकल फुल्ल, रेल्वे प्रशासन झालं खूश
SHARES

बहुचर्चित आणि प्रतिक्षित एसी लोकल २५ डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आली. पण, सेवेत आल्यापासून एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण, आता म्हणजेच मार्च महिन्यापासून मुंबईत उकाडा वाढल्याने हळुहळू का होईना, प्रवासी एसी लोकलला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे.


प्रतिसाद दुप्पट

दररोज एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत दुप्पट गर्दी एसी लोकलमध्ये दिसून येत आहे.


किती जणांनी केला प्रवास?

आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१५ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यातून ३ कोटी १७ लाख ९१ हजार ५२६ रुपयांचा नफा पश्चिम रेल्वेला झाला आहे. शिवाय, जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास रेल्वेचा चांगला फायदा मिळू शकतो, असं पश्चिम रेल्वेचे जन संपर्क अधिकारी गजानन महपुदकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

सामान्य लोकलमधील गर्दीच्या तुलनेत एसी लोकलमधील प्रवासी संख्या खूप कमी असली, तरी त्यामागे अनेक कारणं आहेत. तरीही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचा प्रयोग यशस्वी झाल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


हळूहळू चित्र बदलेल

मुंबईत दमट हवामान असल्याने लोकलचा प्रवास अनेकदा नकोसा होतो. त्यामुळे खास मुंबईकरांसाठी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात एसी लोकलची बांधणी करुन ती मुंबईत आणण्यात आली. जवळपास ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली एसी गाडी २५ डिसेंबरला पहिल्यांदा चालवण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने तिकीटांचा दर अव्वाच्या सव्वा ठेवल्याने सुरुवातीपासून एसी लोकलमधील प्रवासी संख्या फार वाढणार नाही हा समज होताच. पण, हळूहळू हे चित्र बदलेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेला वाटतो.


डिसेंबर ते मार्चपर्यंत एसी लोकलची कमाई

  • डिसेंबर २०१७ - ९००९ प्रवासी - ४ लाख ९९ हजार ९२७ रुपये
  • जानेवारी २०१८ - १ लाख ७७ हजार ४४७ प्रवासी - ८१ लाख २५ हजार ६५५ रुपये
  • फेब्रुवारी २०१८ - २ लाख २८ हजार ८५९ प्रवासी - ९९ लाख २३ हजार ६० रुपये
  • मार्च २०१८ - ३ लाख १३ हजार २०० प्रवासी - १ कोटी ३२ लाख ४२ हजार ८८४ रुपये
  • म्हणजेच डिसेंबर ते मार्चपर्यंत एसी लोकलने एकूण ३ कोटी १७ लाख ९१ हजार ५२६ रुपयांचा नफा कमावला आहे.



हेही वाचा-

उन्हाळ्यात प्रवास होणार 'कूल', बम्बार्डिअर लोकलला लवकरच ३ एसी डबे

शनिवारीदेखील धावू शकते एसी लोकल!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा