Advertisement

लष्करानं केलं पादचारी पुलांच्या बांधकामाला सुरुवात


लष्करानं केलं पादचारी पुलांच्या बांधकामाला सुरुवात
SHARES

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तातडीनं पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पुलासह, मध्य रेल्वेवरील करीरोड आणि आंबिवली स्थानकातल्या पुलाचं काम भारतीय सैन्य दलाकडं सोपवलं. या पुलांचं बांधकाम लवकरात-लवकर व्हावं यासाठी हे बांधकाम भारतीय सैन्य दलाकडं सोपवण्यात आल्याचंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पण, या जवानांच्या राहण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तोच प्रश्न मार्गी लावत या सैन्य दलाच्या राहण्याची सोय रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


कुठे केली रहाण्याची सोय?

आंबिवली स्थानकात बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी जवळपास ३० लष्कर जवानांची आणि रेल्वेच्या १० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमची राहण्याची सोय कल्याणच्या एका गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. हा पूल ३.७४ मीटर एवढा रुंद असणार असून यासाठी एकूण २.७ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. टिटवाळा स्टेशनच्या शेवटी या पुलाचं काम सुरू करण्यात येणार आहे. हा पूल आंबिवलीच्या १ आणि २ प्लॅटफॉर्मला जोडणारा असेल.

करीरोड पुलाच्या बांधणीसाठी एकूण ३९ लष्कर जवानांची टीम तयार करण्यात आली आहे. करीरोड आणि एल्फिन्स्टन पादचारी पुलाचं बांधकाम करणाऱ्या लष्कराच्या टीमला कुलाब्यातून रोज यावे लागणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. हा पूल ६ मीटर रुंद बांधण्यात येणार असून त्यासाठी २ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.


पुलांच्या कामाला सुरुवात

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचं बांधकाम गुरुवारपासून सुरू करण्यात आलं आहे. येथे दादर दिशेकडे ३.२४ मीटर रूंदीचा पादचारी पूल उभारण्यात येणार असून हा पूल बेली पद्धतीचा असणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून ५० लाख रुपये लष्कराला देण्यात आले आहेत. त्याच्या शेजारीच मध्य रेल्वेच्या १२ मीटर रुंदीच्या मोठ्या पादचारी पुलाचं बांधकामही जलदगतीने सुरू आहे. हा पूल परळ स्थानकात लष्कराच्यावतीने दादर दिशेकडील पादचारी पुलाला जोडण्यात येणार असून त्याचा उतार एल्फिन्स्टन पश्चिमेकडील फुल र्माकेटकडे देण्यात येणार आहे. लष्कराच्यावतीने या जोड पादचारी पुलाची उभारणी करण्यासाठी गुरुवारपासून पाया तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.


महिनाभरात चार खांब उभारले जातील

परळ आणि एल्फिन्स्टन दरम्यानच्या पुलासाठी महिन्याभरात चार खांब उभारले जातील, या पुलाची रुंदी साधारणपणे ३.२४ मीटर तर लांबी ११० मीटर इतकी असणार आहे. एल्फिन्स्टन रोड आणि परळला जोडणाऱ्या अरुंद पुलाच्या शेजारीच मध्य रेल्वेने १२ मीटर रुंदीचा पूल उभारण्याचं काम सुरू केलं असून, परळ टर्मिनसचं कामही प्रगतीपथावर आहे.

पादचारी पुलाच्या स्ट्रक्चरचं काम ५ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता लष्कराकडून वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, या सर्व पुलांचं बांधकाम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.



हेही वाचा

परळ पुलाच्या बांधकामाचं साहित्य ठेवायचं कुठे? रेल्वे प्रशासनाला चिंता


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा