Advertisement

ठाकरे बंधूंची संपात उडी; कर्मचाऱ्यांची कुंटुंबियही आता आक्रमक

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं आता दुपारच्या बैठकीत उद्धव ठाकरे तरी तोडगा काढू शकतात का याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे बंधूंची संपात उडी; कर्मचाऱ्यांची कुंटुंबियही आता आक्रमक
SHARES

बेस्ट संपाचा गुरूवारी तिसरा दिवस असून संप मिटण्याएेवजी चिघळतच चालला आहे. बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना बेघर केलं जात असून त्यांच्यावर मेस्मा लावला जात असल्यानं आता कर्मचारी आणि त्यांची कुटुंबंही आक्रमक झाली आहेत. कर्मचारी कुटुंबियांसह रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडं मात्र संपाचं राजकारण सुरू झालं आहे. 
कोरडं आश्वासनच 

बेस्टच्या संपावर तोडगा काढावा यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली असून त्यांच्याकडून केवळ कोरडं आश्वासनच पदरी पडलं आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही आता मध्यस्थी करणार असून लवकरच ते महापौर आणि बेस्ट समितीशी संवाद साधणार आहेत.  गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली संपाची कोंडी ठाकरे बंधू सोडवू शकतील का याकडंच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. 


शिवसेनाच जबाबदार 

 बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नी आक्रमक झाल्या आहेत. बेस्टची सध्या जी काही परिस्थिती आहे त्याला शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हणत शशांक राव यांनी राजकीय पक्षांशी चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. तर तोडगा निघाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संपकारण चांगलंच रंगलं असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य २५ लाख प्रवाशांना बसत आहे.


संपाचा तिढा 

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टचे ३० हजार कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. गुरूवारी संपाचा तिसरा दिवस असून मुंबईच्या रस्त्यावर एकही बेस्ट बस धावलेली नाही.  बेस्ट ही मुंबईची दुसरी लाइफलाईन अाहे. त्यामुळे २५ लाख बेस्ट प्रवाशांचा प्रवास गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच खडतर झाला आहे. संपावर तोडगा काढण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत असतानाच बेस्टच्या कारवाईच्या धोरणामुळे संपाचा तिढा वाढत चालला आहे. 


बळजबरीनं सह्या

बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्यानं कर्मचाऱ्यांच्या पत्नी आक्रमक झाल्या असून त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. आपल्याकडून बळजबरीनं घर खाली करण्याच्या नोटिसांवर सह्या करून घेतल्या जात असल्याचाही कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा आरोप आहे. तर कोणत्याही परिस्थिती आता माघार नाही, असा निर्धारही हजारो कर्मचारी पत्नींनी घेतला असून त्या अजूनही रस्त्यावर आंदोलन करत आहेत.उद्धव ठाकरेंकडं लक्ष

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांची भेट घेतली. आपलं म्हणणं त्यांनी यावेळी मांडलं. पण राज ठाकरे यांनी यावेळी कोणतंही ठोस आश्वासन न देता बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय देऊ असं म्हणत कर्मचाऱ्यांना एकजूट राखण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं आता दुपारच्या बैठकीत उद्धव ठाकरे तरी तोडगा काढू शकतात का याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा - 

सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशी बेहाल!तोडगा कधी? मुंबईकराचा सवाल
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा