मरीन लाईन्स स्टेशनचे नाव मुंबादेवी करा: राज पुरोहित

 Mumbai
मरीन लाईन्स स्टेशनचे नाव मुंबादेवी करा: राज पुरोहित

राज्यात भाजपा सत्ता आल्यापासून रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यात  आता भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. मुंबईचे नाव ज्या मुंबादेवी मंदिरामुळे पडले, त्या मुंबादेवीचे नाव मरीन लाईन्स स्थानकाला द्यावे, अशी मागणी राज पुरोहित यांनी केली आहे.

यासंदर्भात राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहिले आहे. कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये 500 वर्ष जुने मुंबादेवी मंदिर आहे. मुंबादेवीच्या दर्शनासाठी देशभरातून आणि परदेशातून बरेच नागरिक मुंबईत येतात. त्यामुळे मरीन लाईन्स स्थानकाला मुंबादेवी मंदिराचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापुर्वी ओशिवरा रेल्वे स्थानकाचे नाव राम मंदिर स्थानक असे करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईतील पाच रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली होती. आता राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading Comments