Advertisement

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज

लोकलमधील गर्दीचं नियोजन करण्याकरीता कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज असल्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे.

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकार व महापालिका सतत करत आहे. मात्र, मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. लोकलमध्ये गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळं कोरोनापासून प्रवाशांचा संरक्षण व्हाव व रेल्वे प्रवास सुरळीत व्हावा यासाठी काही उपाययोजना रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र, गर्दी काही केल्या कमी होत नाही. त्यामुळं लोकलमधील गर्दीचं नियोजन करण्याकरीता कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज असल्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे.

लोकलमधील गर्दीचं नियोजन करण्यासाठी शासकीय व खासगी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करा, ही मागणी प्रवासी संघटनांकडून नुकतीच सामान्य प्रशासन विभागाकडं करण्यात आली. या विभागानं आपत्ती व्यवस्थापक विभागाला पत्र पाठवून प्रवासी संघटनांच्या निवेदनावर कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वच महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे. कोरोनाकाळात हा प्रवास सुरक्षितपणे व्हावा, यासाठी शासकीय व खासगी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करा, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

मागील ५ वर्षांपासून सातत्यानं मागणी करुनही त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. किमान कोरोनाकाळात आणि त्यानंतही कार्यालयीन वेळांत बदल केल्यास प्रवास सुकर होईल, अशी आशा प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यासंदर्भातच प्रथम सामान्य प्रशासन विभागाकडं उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं नोव्हेंबरच्या अखेरीस निवेदन दिलं आहे.

याशिवाय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या १०० टक्के अनिवार्य उपस्थितीचा फेरविचार करावा, उपनगरीय रेल्वेतून खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी, कसारा-कल्याण व कर्जत-कल्याण या दरम्यान स्थानकामध्ये थांबा देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन सामान्य प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा