Advertisement

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदील

गुरूवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो-४ च्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ चा विस्तार कासारवडवली ते गायमुख असा मेट्रो-४ अ अंतर्गत करण्यात येणार आहे.

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदील
SHARES

मुंबई आणि ठाणे ही दोन्ही महत्त्वाची शहर एकमेकांशी जोडण्यासाठी वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली असून आता लवकरच वडाळा ते कासारवडवली प्रवास सुपरफास्ट होणार अाहे. पण आता कासारवडवलीच्या पुढंही, गायमुखपर्यंत मेट्रो धाव घेणार आहे. त्यामुळे वडाळा ते गायमुख असा सुपरफास्ट, गारगार प्रवास करण्याची संधी लवकरच मुंबईकरांना-ठाणेकरांना मिळणार आहे.

 

मंत्रिमंडळाची मंजुरी

गुरूवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो-४ च्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ चा विस्तार कासारवडवली ते गायमुख असा मेट्रो-४ अ अंतर्गत करण्यात येणार आहे. या मेट्रो-४ अ प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानं आता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


१५०० कोटी खर्च

ठाणे-मुंबई शहर मेट्रोने जोडत हे अंतर कमी करण्यासाठी ३२.३२ किमी वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्ग बांधण्यात येत आहे. अंदाजे १५०० कोटी खर्चाच्या या मेट्रो-४ प्रकल्पाचं कंत्राट ५ पॅकेजमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांना देण्यात आलं आहे. तर या प्रकल्पाच्या कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. दरम्यान कासारवडवलीपर्यंत धावणारी मेट्रो-४ गायमुखपर्यंत न्यावी अशी ठाणेकरांची मागणी होती. ही मागणी मान्य करत वर्षभरापूर्वी यासंबंधीच्या प्रस्तावाला एमएमआरडीए प्राधिकरणाने मंजुरी दिली होती.


२.५ किमीचा मार्ग

या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करत मेट्रो-४ च्या विस्तारीकरणाचा, मेट्रो-४ अ चा प्रस्ताव राज्यमंत्री मंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यानुसार गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो-४ अ ला मान्यता देत या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केला आहे. कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ हा २.५ किमीचा मार्ग असून यात गोवनिवाडा आणि गायमुख अशा दोन मेट्रो स्थानकाचा समावेश असणार आहे. तर या मार्गासाठी अंदाजे ९४९ कोटी खर्च अपेक्षित आहे. या अतिरिक्त खर्चासही गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. 



हेही वाचा - 

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

मुंबईतून धावणार आणखी एक 'राजधानी एक्स्प्रेस'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा