कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्याता आलं होतं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट आपली वाहतूक सेवा देत होती. बेस्टचे अनेक कर्मचारी या काळात आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवा देत होते. परंतु, असं असलं तरी काही कर्मचारी म्हणजे बेस्टचे ११ कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी कामावरून गैरहजर राहिल्याची माहिती समोर येत आहे. कामगार घरी राहिल्यानं परिवहन सेवेतील ११ कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमानं बडतर्फ केलं आहे. या प्रकरणी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांच्याशी बातचीत केली असता त्यांना 'सुडबुद्धीनं काम केलं जात आहे. शिवसेनेनं परत कामगारांसाठी पुन्हा कत्तल खाना सुरू केला आहे', अशी प्रतिक्रीया दिली.
२२ जूनला बॅकबे, धारावी, देवनार, दिंडोशी आगारातील ११ जणांना बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केलेल्या या ११ कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बेस्टच्या या निर्णयाला बेस्ट समितीचे सदस्य आणि कामगार संघटनांनी विरोध केला आहे.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी देखील कारवाई अन्यायकारक असून ती मागे घेण्याची मागणी केली आहे. तसंच, 'सुडबुद्धीनं काम केलं जात आहे. शिवसेनेनं परत कामगारांसाठी पुन्हा कत्तल खाना सुरू केला आहे. आम्ही बेस्टच्या प्रत्येक डेपोमध्ये मुक निदर्शन करत आहोत. आज विक्रोळीच्या डेपोमध्ये निदर्शन सुरू असून पुढे हे थांबलं नाही तर कामगार निर्णय घेतील', असं त्यांनी म्हटलं.
या प्रकरणी बेस्टच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी, 'लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू केली. बेस्टचे अनेक कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र, काही कर्तव्यावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांमुळं बेस्टला नियोजित बस फेऱ्या चालविता आल्या नाहीत. ३,५०० पैकी फक्त १,६०० पर्यंत बसगाड्याच सेवेत आल्या. त्यामुळं गैरहजर असणाऱ्या चालक-वाहकांना बेस्ट उपक्रमानं बोलावणं धाडलं. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठविण्यात आल्या परंतु, त्यांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही. प्रवाशांची संख्या वाढत असून मनुष्यबळाअभावी बससेवा देत येत नाही. अखेरचा पर्याय म्हणून कर्मचाऱ्यांना चार्जशीट ही दिली. परंतु प्रतिसाद न देणाऱ्या बेस्टमधील काही जणांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली', अशी माहिती दिली.
हेही वाचा -
Petrol, Diesel Price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द