Advertisement

सीएसएमटी स्थानकात प्रवाशांसाठी नवं रेस्टॉरंट

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सीएसएमटी स्थानकात प्रवाशांसाठी नवं रेस्टॉरंट
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशातच आता प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार, लवकरच रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्यानुभव घेता येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांसह उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना राबवणार आहे.

रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करून तेथे वेगवेगळे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून चांगले उत्पन्न मिळवण्याची रेल्वेला आस असून त्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरून मेल-एक्स्प्रेस सुटणाऱ्या सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही स्टॉल्स असले तरीही आरामात बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे छोटे रेस्टॉरंटही नाही.

अनेकांना स्थानक व टर्मिनसबाहेरील हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले तर उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू केली आहे. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत सीएसएमटी स्थानक हद्दीत त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वापरात नसलेल्या एका जुन्या रेल्वे डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. हे काम रेस्टॉरंट चालवणाऱ्या कंपनीकडूनच केलं जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे.

'रेस्टॉरंट ऑन व्हील'

  • सीएसएमटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर (पी.डीमेलो रोडच्या दिशेने)असलेल्या मोकळ्या जागेत हे रेस्टॉरंट उभारले जाणार आहे. 
  • ५० जणांना बसण्याची क्षमता असेल. 
  • रेल्वे डब्याच्या बाहेरही मोकळ्या जागेत काही खुर्च्या व टेबल ठेवून रेस्टॉरंट चालकाला जागा वापरण्यास मिळू शकेल.  
  • कंत्राटदारास २८ लाख रुपयांचा खर्चही येणार आहे. 

मध्य प्रदेश रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनेही रेल कोच रेस्टॉरंट सुविधा सुरू केली असून त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली. रेल्वेच्या आसनसोल विभागातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा