टॅक्सी स्वच्छ नसेल तर बसू नका - रावते

 Vidhan Bhavan
टॅक्सी स्वच्छ नसेल तर बसू नका - रावते
टॅक्सी स्वच्छ नसेल तर बसू नका - रावते
See all
Vidhan Bhavan, Mumbai  -  

काळ्या-पिवळया टॅक्सीमध्ये बसताना टॅक्सी स्वच्छ नसेल तर बसू नका, असा सल्ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेच्या सदस्यांना दिला. तसेच टॅक्सी संघटना जेव्हा चर्चा करण्यासाठी येतात त्यावेळी या संघटनांना प्रवाशांच्या तक्रारींची कल्पना देण्यात येते. मात्र त्यात हवी तशी सुधारणा अद्याप झाली नाही, अशी कबुली दिवाकर रावते यांनी यावेळी दिली. काळी-पिवळी टॅक्सी व्यवसायाला चालना मिळावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळी-पिवळी टॅक्सीसाठी अॅपही लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये यावेळी दिली.

शुक्रवारी विधान परिषदेमध्ये काळी-पिवळी टॅक्सीबाबत चर्चा सुरू असताना सदस्यांनी काळी-पिवळी टॅक्सी कशा अस्वच्छ असतात, टॅक्सी चालक प्रवाशांना योग्य वागणूक देत नाहीत असा सूर काढला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आपला अनुभव सभागृहाला सांगताना सांगितले की, त्यांनी काही दिवसांपूर्वी टॅक्सी पकडली होती, टॅक्सी चालक सांगितलेल्या ठिकाणी नेण्यास नकार देत होता. त्याला पोलीस स्टेशनवर नेल्यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला माझी ओळख सांगितली, अशी वेळ आमदारांवर येते तर सर्व सामान्यांना कशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, ओला किंवा उबर गाड्या चालवणारेही पूर्वाश्रमीचे टॅक्सी आणि रिक्षाचालक आहेत. ओला, उबर गाड्या योग्य प्रकारे लोकांना सेवा देत असतात. त्यामुळे अशा व्यवसायाला खीळ घालण्यासाठी नियम बनवू नयेत असे राष्ट्रवादीचे सदस्य किरण पावसकर यांनी यावेळी सांगितले. तर टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत कसे वागावे यासाठी समुपदेशन आयोजित करावे अशी विनंती राष्ट्रवादीचे सदस्य निरंजन डावखरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केली.

Loading Comments