Advertisement

मेट्रो 5 चा चिखलोली स्टेशन पर्यंत विस्तार

चिखलोली रेल्वे स्थानक येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रिकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल.

मेट्रो 5 चा चिखलोली स्टेशन पर्यंत विस्तार
SHARES

ठाणे (thane)-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 (metro 5) प्रकल्पांचा विस्तार करून ही मेट्रो अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली (chikhloli) स्थानकाशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे चिखलोली रेल्वे स्थानकाशी मेट्रो प्रकल्पाची जोडणी होऊन हे स्थानक भविष्यातील एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येऊ शकणार आहे.

शिवाय, कल्याण-बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो 14 प्रकल्पामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि आसपासच्या रहिवाशांना ठाणे आणि मुंबई गाठणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएकडून यासंदर्भात विकास आराखड्याची निमितीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई (mumbai) महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मेट्रो प्रकल्पांचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. यापैकी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचा विस्तार करून हा मार्ग दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर मार्गाने थेट चिखलोली स्थानकापर्यंत पोहोचणार आहे.

या मार्गिकांमुळे या भागातून ठाणे, मुंबईला मेट्रोमार्गे पोहोचणे सहज सोपे होणार आहे. चिखलोली रेल्वे स्थानक येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रिकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार आहे.

याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत. एमआरडीएच्या मुख्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी याबाबत मागणीही केली होती. सध्या या दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

हा मेट्रो प्रकल्प कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, 'एक शहर एक मेट्रो नेटवर्क' या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात होणार आहे.

शिवाय, चिखलोली स्थानकातून रेल्वे आणि मेट्रो अशी द्विस्तरीय वाहतूक सुरू झाल्यास या भागातील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.



हेही वाचा

मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?

तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा कट?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा