Advertisement

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?

सर्वसामान्य प्रवाशांचं लक्ष आपल्याला लोकलने प्रवासाची परवानगी कधी मिळणार? याकडे लागलं आहे.

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?
SHARES

सरसकट सर्व महिला प्रवाशांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा मिळाल्यानंतर आता इतर सर्वसामान्य प्रवाशांचं लक्ष आपल्याला प्रवासाची परवानगी कधी मिळणार? याकडे लागलं आहे. याबाबत ठाकरे सरकारमधील एका जबाबदार मंत्र्यांनी प्रतिक्रिया देत यावर एक ते दोन दिवसांत निर्णय होण्याचे संकेत दिले आहेत.

राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वे प्रशासनाने बुधवारपासून महिला प्रवाशांना मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली. यावरून बरंच राजकारण रंगलं असलं, तरी  सरतेशेवटी महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु इतर प्रवाशांसाठी लोकल ट्रेनची दारं अजून बंदच आहेत.  

याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

हेही वाचा - खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी

सर्वसामान्यांना आता लोकल प्रवासासाठी फार काळ वाट बघण्याची गरज नाही. यासंदर्भात रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यात नुकतीच एक बैठक झाली आहे. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सरकारी विभागांसोबतच विविध खासगी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करताना गर्दी होऊ नये म्हणून कामाच्या वेळा लक्षात घेऊन गाड्यांचं नियोजन करावं लागणार आहे. यातून नक्कीच दिलासा मिळेल, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

याआधी मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आधीच देण्यात आलेली आहे. परंतु मुंबईत हातावर पोट असणारे असेही अनेक घटक आहेत, ज्यांना लोकल प्रवासाची अत्यांतिक गरज आहे, अशा अधिकाधिक लोकांना उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळणं आवश्यक आहे, असं निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं.

दरम्यान, महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने बुधवारपासून आणखी ४ महिला विशेष रेल्वे फेऱ्या सुरू केल्या आहेत. या लोकल विरार येथून चर्चगेटसाठी सकाळी ८.५५ वाजता, त्यानंतर सकाळी ९.४९ वाजता सुटेल. तर चर्चगेटहून विरारसाठी सायंकाळी ६.५५ वाजता आणि रात्री ७.४० वाजता लोकल सुटेल. याआधीच प. रेल्वेवर २ महिला विशेष फेऱ्या चालवण्यात येत होत्या. या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची एकूण संख्या ७०० वरुन ७०४ होईल. तर मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी ते कल्याण आणि पनवेल मार्गावर ४ महिला विशेष लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा