मर्सिडीज-बेंझ कंपनीने हा रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज-बेंझ कंपनीने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे. इतर संस्थांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
कंपनीने ‘रोड हिप्नोसिस'मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पुढील 3 वर्षांसाठी समृद्धी महामार्ग दत्तक घेतला आहे.
चाकण येथे मर्सिडीज कंपनीला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक बोलत होते. ते म्हणाले की, कंपनी अपघात रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहे. यामध्ये चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवणक्षेत्रावर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी तयार करणे आणि अपघात टाळण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करणे यासारख्या कामांचा समावेश आहे.
मंत्री सरनाईक यांनी या उपक्रमातून राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल मर्सिडीज कंपनीचे कौतुक केले. या भेटीदरम्यान त्यांनी मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या ‘ई-वाहन धोरणा'वरही चर्चा केली.
भविष्यात मर्सिडीज कंपनीने ई-वाहन क्षेत्रात आणखी मोठी प्रगती करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. या स्तुत्य उपक्रमानंतर समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा