मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी आणि अश्वमेध या बसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बुधवारी केली. कमी झालेले नवे तिकीट दर सोमवार ८ जुलै पासून लागू होणार आहेत.
राज्यातील ७ वेगवेगळ्या मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या चालवल्या जातात. याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना सेवा दिली जाते. या बस बसची सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं. मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या खासगी टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीचे प्रवासी घटले आहेत. तिकीट दर कमी केल्यामुळे हे प्रवासी पुन्हा शिवनेरीकडे येतील आणि नवीन प्रवाशांचीही त्यात भर पडेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दर कपात करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
मार्ग | सध्याचे तिकीट दर | नवीन तिकीट दर | कपात (रूपयांमध्ये) |
---|---|---|---|
दादर-पुणे स्टेशन (औंधमार्गे) | ५२० रू | ४४० रू | ८० रू |
दादर-पुणे स्टेशन (पिंपरी चिंचवड मार्गे) | ५२० रू | ४४० रू | ८० रू |
दादर-स्वारगेट | ५४० रू | ४६० रू | ८० रू |
ठाणे-स्वारगेट (ऐरोलीमार्गे) | ५२० रू | ४४० रू | ८० रू |
बोरीवली-स्वारगेट (सायनमार्गे) | ६१५ रू | ५२५ रू | ९० रू |
बोरीवली-स्वारगेट (पवईमार्गे) | ६१५ रू | ५२५ रू | ९० रू |
पुणे-औरंगाबाद | ७७५ रू | ६५५ रू | १२० रू |
हेही वाचा-
रस्त्यांनीही धोका दिला, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर गाड्यांची ७ किमी रांग
पाण्यात गाडी अडकल्यावर काय कराल?