Advertisement

कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल

एसटीची पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करूनही राज्यात निम्म्या गाड्या सुरू नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही.

कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल
SHARES

एसटी महामंडळातील (msrtc) कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसटी महामंडळानं महामंडळानं पार्सल (parcel) आणि कुरिअर (courier) विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीची पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करूनही राज्यात निम्म्या गाड्या सुरू नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. त्यामुळं काम नसलेल्या कामगारांसाठी एसटी महामंडळानं हा निर्णय घेतला आहे. परिणामी लवकरच १ हजार एसटी कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणाचं प्रमाण कमी-अधिक स्वरूपात आहे. दुर्गम भागातील खेड्यातही अद्याप एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळं सध्या सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. काम नाही तर पगार नाही, हा तिढा सोडवण्यासाठी महामंडळात रोटेशन पद्धतीनं कामगारांना काम देण्यात येत आहे. मात्र यामुळे पगार कमी येत असल्यानं एसटी कामगारांमध्ये नाराजी आहे.

खासगी कंपनीला एसटीमधून पार्सल आणि कुरिअरसेवेची मुभा आहे. प्रवासी एसटीमध्ये मर्यादित स्वरूपात जागा उपलब्ध असते. यामुळे पार्सल सामानाची मर्यादा येते. उलट एसटीच्या मालवाहतूक ट्रकमुळे मोठ्या प्रमाणात पार्सल आणि कुरिअर पोहोच करता येणं शक्य आहे. पार्सल-कुरिअरचे राज्यभरात काम सुरू केल्यास महामंडळाच्या तिजोरीतही भर पडणार असल्याची माहित मिळते.

या कामासाठी किमान १ हजार मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सध्या काम नसलेल्या कामगारांचा यात समावेश करून हा प्रश्न सुटू शकणार असल्याचं समजतं. एसटी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मालगाड्यांतून पार्सल आणि कुरिअरसेवा करण्यात येणार आहे. मालवाहतूक विभागाअंतर्गत ही सेवा असणार आहे. यासाठी खूप व्यापक स्तरावर नियोजनाची गरज आहे. सध्या त्यादृष्टीने एसटी महामंडळ काम करत आहे.

एसटीच्या रिकाम्या टपांवर किंवा बसस्थानकांवरील उपलब्ध जागेत पार्सल वाहतूक योजना राबवली जात आहे. एसटी महामंडळ ही योजना स्वत: राबवत होते. गेल्यावर्षी यवतमाळ येथील खासगी कंपनीला यासाठी नियुक्त करण्यात आले. या कंपनीला परवानाधारक म्हणून २६ जानेवारी २०१९ ते २५ जानेवारी २०२२ या काळासाठी नियुक्त केले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा