Advertisement

अखेर एसटीची १८ टक्के भाडेवाढ, १५ जूनच्या मध्यरात्रीपासून होणार लागू

तिकीट दरवाढीशिवाय कोणताही पर्याय नसलेल्या एसटीनं अखेर बुधवारी तिकीट दरात १८ टक्क्यांची दरवाढ करत १५ जूनच्या मध्यरात्रीपासून दरवाढ लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अखेर एसटीची १८ टक्के भाडेवाढ, १५ जूनच्या मध्यरात्रीपासून होणार लागू
SHARES

इंधनदरवाढीमुळे आर्थिक तोटा सहन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा(एसटी)ने अखेर तिकीट दरात १८ टक्क्यांनी वाढ केली आहे. आधी ३० टक्के दरवाढीचे संकेत देत एसटीनं ग्राहकांना मोठा झटका दिला होता खरा; पण १८ टक्क्यांची दरवाढ करत ग्राहकाला थोडाफारही दिलासा दिला आहे. काहीही असलं, तरी या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला नक्कीच झळ बसणार आहे. ही दरवाढ १५ जूनच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली.


डिझेल दरवाढीचा फटका

एसटीच्या सर्वच्या सर्व बसगाड्या डिझेलवर चालतात. असं असताना गेल्या कित्येक महिन्यांत डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असून मागील २०-२५ दिवसांत डिझेलच्या दरांनी विक्रमी झेप घेतली आहे. परिणामी एसटीवर डिझेल खरेदीच्या रूपानं पडणारा भार वाढला असून एसटीवर ४७० कोटींचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यातच देखभाल-दुरूस्तीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून टोलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीला आणखी आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.


करमाफीकडे दुर्लक्ष

या धर्तीवर एसटीनं राज्य सरकारकडे डिझेलवरील विविध करात माफी देण्याची मागणी केली होती. पण ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही, तर दुसरीकडं नुकतीच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळेही आता एसटीवरील खर्च आणखी वाढल्यानं आता तिकीट दरवाढीशिवाय कोणताही पर्याय नसलेल्या एसटीनं अखेर बुधवारी तिकीट दरात १८ टक्क्यांची दरवाढ करत १५ जूनच्या मध्यरात्रीपासून दरवाढ लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान डिझेलवरील विविध कर माफ करण्याच्या मागणीचा राज्य सरकारने विचार केला. त्यानुसार ही मागणी मान्य झाली, तर दरवाढीचा पुनर्विचार करत दरवाढ मागे घेण्याचे संकेतही रावते यांनी दिले आहेत.



हेही वाचा-

डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

पालकांवर स्कूल बस फी वाढीची टांगती तलवार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा