अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली 'तेजस एक्स्प्रेस'ची सेवा मुंबई-गोवा मार्गावर 22 मेपासून प्रत्यक्षात येणार आहे. आसनांमागे एलईडी, चहा-कॉफीचे व्हेंडिंग मशिन्स, आरामदायी आसने आदी सुविधा असणारी पहिलीवहिली तेजस मुंबई-गोवा मार्गावर चालविण्यात येणार आहे. 
शनिवारी तेजस एक्स्प्रेस मुंबईमध्ये दाखल झाली असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के.शर्मा यांनी आणि मध्य रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांनी तेजस एक्स्प्रेसची पाहणी केली.

विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बोगीत 56 बैठका असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बोगीत 6 सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वेत वायफायची सुविधाही देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर विमानात गरजेवेळी बटन दाबताच जशा एअर हॉस्टेस येतात. त्याच पद्धतीने रेल्वेत अटेंडेंटला बोलावण्यासाठी कॉल बेलची सुविधा देण्यात आली आहे. याचसोबत गरमगरम जेवण देण्याची सोय देखील प्रत्येक बोगीत करण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानयुक्त 'तेजस'च्या एका कोचसाठी लागलेली रक्कम 3.4 कोटी एवढी आहे. ही रेल्वे 8 तास 25 मिनिटांत मुंबई ते गोवा अंतर कापणार आहे.
 सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या स्थानकावर तेजस थांबणार आहे. सुमारे 200 किमी इतक्या वेगाने तेजस धावू शकते. मात्र भारतीय रेल्वेरूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल 130 किमी इतक्या वेगाने धावण्याची शक्यता आहे. 
या गाडीचे भाडे शताब्दीच्या 25 ते 30 टक्के जादा असणार आहे. पण सामान्य जनतेला हे भाडे परवढण्यासारखे आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे.
असे असतील 'तेजस' चे दर
| मार्ग | एसी चेअर कार | एक्झिक्युटीव्ह | 
| सीएसटी-रत्नागिरी | 835 रु. | 1785 रु. | 
| सीएसटी-कुडाळ | 1080 रु. | 2,340 रु. | 
| सीएसटी-करमाळी | 1,190 रु. | 2,590 रु. | 
पावसाळी वेळापत्रक -
सोमवार, बुधवार, शनिवार
सीएसटी - पहाटे 5.00 वाजता
करमाळी - दुपारी 3.40 वाजता
परतीचा प्रवास -
मंगळवार, गुरुवार, रविवार
करमाळी - दुपारी 2.30 वाजता
सीएसटी - रात्री 11 वाजता
पावसाळा वगळता -
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
सीएसटी - पहाटे 5 वाजता
करमाळी - दुपारी 1.30 वाजता
परतीचा प्रवास
करमाळी – दुपारी 2.30 वाजता
सीएसटी – रात्री 11 वाजता
तेजसची वैशिष्टे:
• वायफाय सुविधा
• शुद्ध पाण्याची सोय
• उत्कृष्ट सीट
• उर्जा कार्यक्षम एलईडी लाईट्स
• डिजिटल माहिती बोर्ड
• इलेक्ट्रॉनिक वायफाय प्रणालीने बनलेले ब्रेक
• उत्कृष्ट शौचालय
• अग्निशामक प्रणाली
• सीसीटीव्ही कॅमेरा
• आपत्कालीन व्दार
• आपत्कालीन इलेक्ट्रॉनिक सूचना बेल
