१४ डिसेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार धावणार मध्य रेल्वेच्या लोकल

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

SHARE

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या १४ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य उपनगरीय मार्गावर नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. मागील वर्षभरात नवीन मेल-एक्स्प्रेस गाड्यांची पडलेली भर आणि त्यामुळं लोकलचं बिघडलेले वेळापत्रक लक्षात घेत उपनगरीय वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

लोकलच्या वेळेत बदल

लोकल वेळेत धावण्यासाठी वेळापत्रकात जवळपास ४० लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल केला आहे. या वेळापत्रकात प्रवाशांना नवीन फेऱ्यांचा दिलासा नसून, फेऱ्यांचा विस्तारावरही अधिक भर देण्यात आलेला नाही. मध्य रेल्वे मार्गावर ठाण्या पुढील म्हणजे दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ यासह आणखी काही स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षांगणिक वाढत आहे. त्यामुळं लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांची असते.

स्वतंत्र मार्ग 

ठाणे ते दिवा, कुर्ला ते परळ आणि सीएसएमटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाल्यास मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. तसंच, १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. परंतु, मागील १० वर्ष सुरू असलेला हा प्रकल्प पूर्ण झाला नलल्यामुळं मेल-एक्स्प्रेसना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होत नाही. परिणामी लोकल उशीरा धावत असून प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे.


लोकल वेळेत धावणार?

मुख्य मार्गावरील लोकलचं वेळापत्रक सुधारण्यासाठी जवळपास ४० फेऱ्यांच्या वेळांत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. यामधील काही फेऱ्या या २ ते ५ मिनिटे आधी किंवा नंतर सोडण्याचं नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं लोकल वेळेत धावणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली यासह अन्य लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.हेही वाचा -

एसटीच्या अॅपबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी दाखल

राज्यात शासकीय काम आता मराठी भाषेतचसंबंधित विषय
ताज्या बातम्या