'फुकटच्या वस्तूला काही मोल नसतं' हेच खरं. तेजस एक्स्प्रेसमध्ये चोरीला गेलेले हेडफोन हे त्याचं ताजं उदाहरण. त्यामुळं फुकट्यांची ही सवय मोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता तेजस एक्स्प्रेसमध्ये 20 रुपयांत हेडफोन देण्याचा निर्णय घेतला आहे. कमी दरात चांगल्या दर्जाचे हेडफोन पुरविण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम महामंडळा (आयआरसीटीसी)ने पुढाकार घेतला आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून अन्य प्रवाशांनी वापरलेले हेडफोन इतर प्रवासी वापरण्यास तयार नसतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने 20 रुपयांच्या हेडफोनचा पर्याय शोधला आहे. तेजस एक्स्प्रेसमध्ये लवकरच हे नवीन हेडफोन मिळतील.
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, हेडफोन, वायफाय आदी सुविधा रेल्वे प्रवाशांना देण्यात आली आहे. परंतु, पहिल्याच प्रवासात आयआरसीटीसीने पुरविलेले बहुतांश हेडफोन प्रवाशांनी चोरुन नेल्यामुळे दुसऱ्या फेरीतील प्रवाशांना हेडफोन मिळू शकले नाहीत. यावरुन रेल्वेमधील वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला.
हेही वाचा -
तेजस तीन तास उशिराने सुटूनही 1 मिनीट आधी पोहचली
नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा
'तेजस एक्स्प्रेस'ला कणकवलीमध्ये थांबा द्या - अरविंद सावंत
सध्या या एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे सुमारे 70 टक्के प्रवासी स्वतःचे हेडफोन वापरत असल्याने उर्वरित प्रवाशांना हेडफोन उपलब्ध व्हावेत यासाठी आयआरसीटीसीने 20 रुपयांत हेडफोनची योजना आखली आहे. हेडफोन खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्पात पोहोचल्याचे सांगण्यात येत असून कंत्राटदार 20 रुपयांत या हेडफोनचा पुरवठा करतील. प्रवाशांच्या मागणीनुसार कंत्राटदाराचे प्रतिनिधी हे हेडफोन पुरवतील.