Advertisement

ओला-उबर टॅक्सीचालकांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा

मुंबई, ठाणे अाणि नवी मुंबईतील जवळपास ३० हजार ओला-उबर टॅक्सीचालक-मालक शनिवारपासून संपावर गेले असून येत्या सोमवारी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ओला-उबर टॅक्सीचालकांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा
SHARES

दिवाळीची डेडलाईन उलटून गेल्यानंतरही सरकारनं ओला-उबर या टॅक्सीचालकांच्या १३ मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त झालेल्या या चालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. मुंबई, ठाणे अाणि नवी मुंबईतील जवळपास ३० हजार ओला-उबर टॅक्सीचालक-मालक शनिवारपासून संपावर गेले असून येत्या सोमवारी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 


भाडेवाढीची मागणी

पेट्रोल डिझेल आणि सी.एन.जी गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्या तुलनेत  अॅप बेस्ड टॅक्सीच्या भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ होताना दिसत नाही. याचा फटका सर्वसामान्य टॅक्सी चालक -मालक यांना होत असून त्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे. यामुळं अॅप बेस्ड टॅक्सीच्या भाड्यात दरवाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी २२ ऑक्टोबर रोजी अंधेरीच्या ओला कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतु कंपन्यानी कार्यालय बंद ठेवल्यानं या संतापाचा भडका उडाला. त्यामुळं ओला-उबर टॅक्सी चालकांनी बेमुदत संप जाहीर केला होता. 


आश्वासनानंतर संप मिटला

त्यानंतर दिवाळीचा कालावधी लक्षात घेउन हा संप मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते, ओला-उबर टॅक्सीचालक-मालक संघटना, टॅक्सी कंपन्या यांच्यात चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर १२ दिवसांनी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी हा संप मिटवण्यात आला. 


अाश्वासनाकडे दुर्लक्ष

मात्र त्यानंतरही या कंपन्यांनी आश्वासन न पाळल्यानं अखेर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सुमारे ३० हजारपेक्षा जास्त ओला-उबर टॅक्सीचालकांनी संपाची हाक दिली आहे. यानुसार शनिवारपासून ओला-उबर टॅक्सीचालक संपावर गेले असून येत्या सोमवारी १९ नोव्हेंबर रोजी भारतमाता ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार अाहे. यात विविध ओला-उबर टॅक्सीचालक, मालक, त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. 


या आहेत प्रमुख मागण्या 


  • 'मिनी', 'मायक्रो', 'गो' गाड्यांमध्ये प्रति किमी १२ रुपये, बेस फेअर ५० रुपये व प्रतीक्षा कालावधीचे दोन रुपये मिळावेत.
  • 'प्राइम', 'सेडान' प्रति किमी १५ रुपये, बेस फेअर ७५ रुपये व प्रतीक्षा कालावधीचे तीन रुपये मिळावेत. 
  • 'एक्स एल', 'एक्सयूव्ही' प्रति किमी १९ रुपये, बेस फेअर १०० रुपये व प्रतीक्षा कालावधीचे चार रुपये मिळावेत.
  • कंपनीने कमिशन १५ टक्के अाणि कर रद्द करावे. 
  •  शेअर, पूल, मायक्रोमध्येही दरवाढ करावी.



हेही वाचा - 

मुंबईतील ४७ स्थानकांवर लागणार मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर

बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याला बेस्टमधील कामगार संघटनांचा विरोध




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा