Advertisement

मेट्रो-3 चे फक्त तीनच स्टेशन रेल्वे स्टेशनला जोडणार


मेट्रो-3 चे फक्त तीनच स्टेशन रेल्वे स्टेशनला जोडणार
SHARES

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मेट्रो-3 मार्ग रेल्वे मार्गांशी जोडण्यात येणार असल्याने रेल्वेवरील ताण कमी होईल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून केला जात आहे. मात्र हा दावा साफ खोटा असल्याचा आरोप आता माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधातील याचिकाकर्त्यांकडून होऊ लागला आहे. कारण मेट्रो-3 मधील 27 स्थानकांपैकी केवळ तीनच मेट्रो स्थानके थेट रेल्वे स्थानकांशी जोडली गेली आहेत. उर्वरित मेट्रो स्थानके रेल्वे स्थानकापासून फारच दूर असल्याचे म्हणत मेट्रो-3 च्या आराखड्यावरच आता माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी आक्षेप घेतला आहे.

चर्चगेट, सीएसटी आणि मुंबई सेंट्रल ही तीन रेल्वे स्थानकेच मेट्रो स्थानकांशी जोडली जाणार आहेत. या रेल्वे स्थानकापासून काही मिनिटांच्या अतंरावरच ही तीन मेट्रो स्थानके असल्याने मेट्रोतून उतरून थेट रेल्वेत वा रेल्वेतून उतरून थेट मेट्रोत जाणे प्रवाशांना सहज शक्य होणार आहे. मात्र उर्वरित 24 मेट्रो स्थानके कुठेही रेल्वेशी जोडलेली नाहीत. दादर मेट्रो स्थानक हे शिवसेना भवनाजवळ असणार असून, येथून दादर रेल्वे स्थानक 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर बीकेसी मेट्रो स्थानकापासून वांद्रे स्थानक पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. महत्त्वाचे म्हणजे बीकेसी आर्थिक केंद्र असून, बीकेसीत नोकरीच्या निमित्ताने येणारा मोठा वर्ग हा पश्चिम उपनगरातील आहे. तर जेथून मेट्रो सुरू होणार आहे त्या दक्षिण मुंबईतून बीकेसीत येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे बीकेसीत येणाऱ्यांना या मेट्रोचा काय आणि कसा फायदा होईल? असा प्रश्नही बाथेना यांनी उपस्थित केला आहे.

मेट्रो-3 चा आराखडा 1991 मध्ये तयार करण्यात आला होता. तेव्हा कुलाबा, चर्चगेट आणि सीएसटी ही आर्थिक केंद्र होती आणि हेच विचारात घेऊन हा मेट्रो मार्ग तयार करण्यात आला होता. आता मात्र दक्षिण मुंबईतील या आर्थिक केंद्राचे महत्त्व कमी होत चालले असून बीकेसी, एमआयडीसी आणि अंधेरी ही ठिकाणे नवी आर्थिक केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. असे असताना 2017 मध्ये मेट्रो बांधताना एमएमआरसी 1991 चा आराखडा कसा मान्य करते? असा सवालही बाथेना यांनी करत ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे म्हटले आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही असे म्हणत एमएमआरसीने मेट्रो आराखड्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर. रमण्णा यांना याविषयी विचारले असता त्यांनी तीनच मेट्रो स्थानके रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र आराखडा चुकीचा आहे वा मेट्रो-3 ला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही हे आरोप मात्र फेटाळले आहेत. हा मार्ग मुंबईकरांच्या फायद्याचा ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा