Advertisement

खासगी वाहतूकदारांना दणका! एसटीच्या दीडपटच भाडं आकारता येणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी कंत्राटी वाहनांचं भाडं (तिकीट) निश्चिती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याप्रमाणे आता उन्हाळ्यादरम्यान वा गर्दीच्या काळात खासगी प्रवासी वाहतुकदारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या जास्तीत जास्त दीडपट इतकंच भाडं आकारता येणार आहे.

खासगी वाहतूकदारांना दणका! एसटीच्या दीडपटच भाडं आकारता येणार
SHARES

उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुंबईकर मोठ्या संख्येनं गावी जातात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमीच खासगी प्रवासी वाहतुकदारांची चांदी असते. ही वाढती मागणी लक्षात घेता हे खासगी प्रवासी वाहतुकदार प्रवाशांचे खिसे कापण्यासाठीच बसलेले असतात की काय असा प्रश्न पडतो. कारण उन्हाळ्याचा सुट्टी आणि दिवाळीत बस आणि ट्रॅव्हल्सचं तिकीट अव्वाच्या सव्वा वाढवतात. पण आता ही लुट थांबणार आहे.


जास्तीत जास्त दीडपट तिकीटदर

उन्हाळ्यात होणाऱ्या प्रवाशांच्या या आर्थिक लुटीची गंभीर दखल अखेर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी कंत्राटी वाहनांचं भाडं (तिकीट) निश्चिती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याप्रमाणे आता उन्हाळ्यादरम्यान वा गर्दीच्या काळात खासगी प्रवासी वाहतुकदारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या जास्तीत जास्त दीडपट इतकंच भाडं आकारता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती रावते यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना होणार रद्द

एसटीच्या दीडपट इतकंच भाडं आकारण्याचे आदेश शुक्रवारी संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. तर या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासह जो या नियमांचं उल्लंघन करेल त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आल्याचं रावते यांनी सांगितलं आहे. नियमानुसार जो कोणी खासगी प्रवासी वाहतुकदार या नियमांचं पालन करणार नाही, त्याचा वाहन परवाना रद्द होणार आहे.


सीआयआरटीच्या अहवालानंतर निर्णय

यासाठी पुण्यातील केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेनं खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी सुविधांचा अभ्यास करत अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. या अहवालानुसार दीडपट भाडे आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा

उन्हाळ्यात फिरायला जाताय? मग तुमच्यासाठी खूशखबर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा