मुंबई ते गोवा मार्गावर सुपरफास्ट धावणाऱ्या अत्याधुनिक 'तेजस एक्स्प्रेस' मधील चोरीचे सत्र अजूनही सुरूच आहे. ही एक्स्प्रेस रुळांवर येताच पहिल्याच दिवशी गाडीतून १०० पेक्षा जास्त हेडफोन्स चोरीला गेले होते. प्रवाशांच्या या 'फुकट्या' स्वभावावरही खूप टीका करण्यात आली होती. पण प्रवाशांच्या जोडीनेच 'तेजस' एक्स्प्रेसमधील मौल्यवान वस्तूंवर गाडीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले रेल्वे कर्मचारीही 'हात साफ' करत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
गाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक रेल्वे कर्मचारी बाथरुममधील 'हँड शॉवर' चोरून नेत असल्याचे दिसून आले आहे. मनोज भडंगे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो 'गार्ड' या पदावर रेल्वेत कार्यरत अाहे. याप्रकरणी पोलिसांनी गार्डविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पहा अशी केली चोरी -
Railway guard steals hand-washer in Tejas Express, Caught on CCTV camera. @sureshpprabhupic.twitter.com/Q00XmnZKNP
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 18, 2017
भडंगे याच्याकडे रेल्वे गाड्यांच्या शटींगची जबाबदारी असल्याने 'तेजस एक्स्प्रेस' यार्डमध्ये उभी असताना या गाडीचे दरवाजे बंद करण्याचे काम भडंगेच करायचा. पण काम करतानाच तो गाडीत चोरी देखील करायचा हे 'हँड शाॅवर' चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आले आहे. फुटेजमध्ये भडंगे संशयास्पदरित्या बाथरुममध्ये शिरताना आणि पिशवीतून 'हँड शॉवर' घेऊन बाहेर येताना स्पष्टपणे दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे भडंगे याला महिन्याला ४० हजार रुपये पगार असतानाही, त्याने प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या वस्तू चोरण्याचा केलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असाच आहे.
चोरीची माहिती मिळताच माझगाव यार्डच्या कॅरेज अँड वॅगन डिपार्टमेंटचे सिनियर सेक्शन इंजिनीअर यांनी आरपीएफला कळवले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्यानंतर भडंगेविरोधात गुरूवारी खटला दाखल करण्यात आला. या हँड शॉवरची किंमत अवघी १८० रुपये असून ४ ऑगस्ट रोजी हे हँड शॉवर माझगाव यार्डमधून हस्तगत करण्यात आले होते.
भडंगेवर रेल्वे संपत्ती (अवैध पोझिशन) अधिनियम १९६६ चे कलम ३ (अ) अंतर्गत खटल दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे भडंगे याने किती चोऱ्या केल्या? 'तेजस एक्स्प्रेस'मधील हेडफोन चोरीत त्याचाही हात आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहे.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)