Advertisement

पोलिसांच्या नाकावर टिच्चून शेअर टॅक्सी चालकांचं रॅश ड्रायव्हिंग


पोलिसांच्या नाकावर टिच्चून शेअर टॅक्सी चालकांचं रॅश ड्रायव्हिंग
SHARES

मुंबईत कार, दुचाकी यांसारख्या खासगी वाहन चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगला आणि भरधाव वेगाला लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. नाकाबंदी, दंडात्मक कारवाई यांसारख्या अनेक उपाययोजनांचा वापर करून रॅश ड्रायव्हिंगला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा भाग असलेले शेअर टॅक्सी चालक वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रॅश ड्रायव्हिंग करून वाहतुकीच्या नियमांचं उल्लघन करत असल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई शहरातील महत्वाचं ठिकाण असलेल्या 'दादर'च्या परिसतील शेअर टॅक्सी चालक रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचं समोर आलं आहे. 

दादर पश्चिम स्थानकाबाहेर 'दादर स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर' या मार्गावर दररोज सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी शेअर टॅक्सी चालक प्रवाशांना सेवा पुरवतात. प्रवाशांचाही या सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र, हे टॅक्सी चालक वेगमर्यादेचं उल्लंघन करून सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. टॅक्सीमध्ये आसन क्षमतेपेक्षा एक प्रवासी जास्त बसवतात. त्याशिवाय या मार्गावरून जाताना भरधाव वेगानं टॅक्सी चालवतात. तसंच रस्त्याला ट्रॅफिक असेल तर त्यामधून भरधाव वेगात ओव्हटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या अशा ड्रायव्हिंगमुळे दादरमधील दादर स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या 'भवानी शंकर रोड' या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. 

अनेकदा वाहनं भरधाव वेगात असल्यानं अपघातही होतो. त्यावेळी टॅक्सी चालक आणि खासगी वाहन चालक यांच्यात वाद होऊन हाणामारी होते. अशा अनेक घटना वारंवार या मार्गावर शेअर टॅक्सी चालकांमुळं होत असतात. विशेष म्हणजे हा मार्ग दादर स्थानकात जाण्यासाठी महत्वाचा असल्यानं सतत या मार्गावर वाहतूक कोंडी असते. त्यामुळं वाहतूक पोलिसांनाही या कोंडीची सुटका करण्यासाठी तैनात केलं जातं. मात्र, या पोलिसांनाही हे टॅक्सी चालक घाबरत नसल्याचं पाहायला मिळतं. नेहमीच या टॅक्सी चालकांची दादर स्थानकातील फुल मार्केट परिसरात गर्दी जमलेली असते. त्यामुळं प्रवाशांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

या टॅक्सी चालकांकडून वेगमर्यादेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा या मार्गावरून जाणारे चाकरमानी याविरोधात वाहतूक पोलिसांकडे तक्रारी देखील करत आहेत. मात्र, तरीही या शेअर टॅक्सी चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून बेदरकारपणे वाहनं चालवल्यानं अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळं याबाबत वेळीच गांभीर्य न दाखवल्यास अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे.

या मार्गावर अनेक शाळा आहेत.  विशेष म्हणजे मुक-बधीर मुलांचीही शाळा या मार्गावर आहे.  या रॅश ड्रायव्हिंगमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या शेअर टॅक्सी चालकांच्या रॅश ड्रायव्हिंगबाबत 'मी स्वत: उपस्थित वाहतूक पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी कारवाई करू', असं म्हटलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका टॅक्सी चालकाचा आणि प्रवाशाचा या प्रकरणावरून झालेला वाद पाहायला मिळाला. मागील अनेक महिन्यांपासून टॅक्सी चालकांच्या ड्रायव्हिंगवरून पादचारी आणि स्थानिक तक्रारी करत आहेत. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या रहिवाशांमध्ये यावरून चांगली चर्चा रंगलेली असते. मात्र, तक्रारी करून देखील पोलीस या शेअर टॅक्सी चालकांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे काही नियम बनवले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्येे नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक कारवाई केली जाते. मात्र, या शेअर टॅक्सी चालकांची रॅश ड्रायव्हिंग पाहता पोलीस वाहतुकीचे नियम विसलेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

मुंबईत नेहमी एखादी घटना घडल्यानंतर घटनास्थळी योग्य ती कारवाई केली जाते. मात्र, ही घटना घडू नये, रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी कोणतीच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत नाही. त्यामुळं इथंही एखाद्या दुर्घटनेत  एखाद्या पादचाऱ्याचा जीव गेल्यावरच वाहतूक पोलिसांना जाग येणार का? असा प्रश्न येथील स्थानिक उपस्थित करत आहेत. हेही वाचा -

Video: 'मिशन मंगल'ला मनसेचं ग्रहण, मराठीतल्या डब व्हर्जनला खोपकरांचा विरोध

बिग बॉसच्या सदस्यांना कोण म्हणतंय कार्टी?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा