Advertisement

मुंबई लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण


मुंबई लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळं मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं सरकारनं कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत मुंबईची लाइफलाइन लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. मागील ३ महिने लोकल बंद होती. मात्र, या काळात बेस्ट बस व एसटीनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा दिली. परंतु, प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १५ जूनपासून लोकल सुरू झाली. आज म्हणजे बुधवार १५ जुलै रोजी एक महिना झाला, लोकल सुरू होऊन. या एका महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर ३५ लाख प्रवासी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २६ लाख कर्मचाऱ्यांनी प्रवास केला आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकल सुरु झाली. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गवरून ३६२ लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. यानंतर या फेऱ्यामध्ये वाढ करून एकूण ७०२ लोकल फेऱ्या आणि २ मेमु फेऱ्या धावण्यात आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरून एका महिन्यात सुमारे २६ लाख ९ हजार ९० अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. यातून पश्चिम रेल्वेला २ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न मिळाले. तर, मध्य रेल्वेवर सुमारे ३५ लाख ४६ हजार ३६६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला ३ कोटी ४६ लाखांचे उत्पन्न मिळाले.

रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याद्वारे स्थानकावर नियोजन केले जाते. स्थानकात येण्याचे-जाण्याचे प्रवेशद्वार निश्चित केले आहे. त्यातूनच ये-जा करण्याच्या सूचना सुरक्षा जवानांकडून दिल्या जात होत्या. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोरीने जागेची विभागणी केली आहे. याद्वारे कर्मचारी रांगेत प्रवास करतात. मध्य रेल्वे प्रशासन लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर स्वच्छता कर्मचारी सॅनिटायझरची फवारणी लोकलवर करतात. तर, पश्चिम रेल्वे प्रशासन दिवसातून दोनदा लोकल सॅनिटायझेशन करते.  मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सीएसएमटी येथे उभी असल्यावर तिच्यावर सॅनिटायझरची फवारणी केली जाते. बाहेरून आणि आतून लोकलवर फवारा मारला जातो. त्यानंतर ही लोकल दुसऱ्या फेरीसाठी वापरली जाते.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सॅनिटाइझ करण्यासाठी दोन-तीन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्याद्वारे संपूर्ण लोकल स्वच्छ केली जाते. यासह कारशेडमध्ये संपूर्णरित्या आतून-बाहेरून मशीनद्वारे लोकलची स्वच्छता केली जाते. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल दिवसातून दोनदा सॅनिटाइझ केली जाते.

सकाळच्या सत्रात धावणाऱ्या लोकल दुपारनंतर सॅनिटायझरने स्वच्छ केल्या जातात. या लोकल कारशेडमध्ये रवाना केल्या जातात. दुपारच्या सत्रात दुसऱ्या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. या लोकलच्या सर्व फेऱ्या संपल्यावर लोकल जंतुनाशक फवारणी केली जाते. 



हेही वाचा -

Jio 5G: पुढच्या वर्षी येणार जिओचं ५ जी नेटवर्क- मुकेश अंबानी

‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा