'आकड्यां’चा टोलझोल!

  Mumbai
  'आकड्यां’चा टोलझोल!
  मुंबई  -  

  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचे नवनवीन झोल उघड होत आहेत. त्यात आता आणखी एका झोलची भर पडली आहे. ती म्हणजे आकड्यांच्या झोलची. द्रुतगती मार्गावरून दररोज 30 हजार वाहने टोल न भरताच प्रवास करत असल्याची आश्चर्यकारक माहिती खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे. टोलवसुलीसंबंधीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकेडवारीमधून ही माहिती उघड झाली आहे. टोल अभ्यासकांनी मात्र दिवसाला इतक्या संख्येने टोल फ्री वाहने जाऊच शकत नाहीत, यावर कुणीही विश्वास ठेऊ शकत नाही असे म्हणत टोलचा झोल, टोलवसुलीची निश्चित आकडेवारी लपवण्यासाठीचा कंत्राटदार आणि एमएसआरडीसीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

  मुख्य माहिती आयुक्तांच्या आदेशानुसार एमएसआरडीसीकडून दर महिन्याला टोलवसुलीची आकडेवारी, माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. दरम्यान, 289 कोटींची टोलवसुली याआधीच नोव्हेंबर 2016 मध्ये पूर्ण झाली आहे. त्यामुळे टोलवसुली बंद करण्याची मागणी टोलअभ्यासकांनी उचलून धरली आहे. तर कंत्राटदार-एमएसआरडीसी कशी बेकायदा टोलवसुली करत कोट्यवधी कमवत आहेत हेही सातत्याने समोर आणत आहे. असे असतानाच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टोलवसुलीच्या आकडेवारीत दिवसाला 30 हजार वाहने टोल न भरताच जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 1 एप्रिलला  29,788 तर 2 एप्रिलला 30,212 वाहनांनी टोल न भरताच प्रवास केला असून, यात चारचाकी गाड्यांपासून ते ट्रक आणि अतिजड वाहनांचाही समावेश असल्याचे नमूद केले आहे.

  प्रत्येक टोलनाक्यावर दोन्ही बाजूला पोलीस, कंत्राटदारांचे कर्मचारी असतात. सीसीटीव्ही कॅमेरे असतात. अशावेळी ट्रक आणि अतिजड वाहने टोल चुकवून कशी जाऊ शकतात? यावर लहान मूल तरी विश्वास ठेवले का? हा केवळ आकड्यांचा झोल असून, यातून सर्वांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. टोलवसुलीची निश्चित रक्कम लपवण्याचा हा प्रयत्न आहे 

  - विवेक वेलणकर, टोल अभ्यासक

  टोलबंदीविरोधातील जनहित याचिका नुकतीच दाखल झाली असून, या सर्व झोलची उत्तरे आता कंत्राटदार आणि एमएसआरडीसीला न्यायालयासमोर द्यावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंबंधी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.