Advertisement

अर्रर्रर्र! वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका

गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा हा प्रवास केवळ २० ते २५ मिनिटांत पार करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न शुक्रवारपासून पूर्ण होणार होतं. पण सध्या तरी या स्वप्नाला ब्रेक लागला आहे. कारण शुक्रवारी (१ फेब्रुवारी)पासून सुरू होणारी उबर वाॅटरटॅक्सी सेवा तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकलेली नाही.

अर्रर्रर्र! वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका
SHARES

गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा हा प्रवास केवळ २० ते २५ मिनिटांत पार करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न शुक्रवारपासून पूर्ण होणार होतं. पण सध्या तरी या स्वप्नाला ब्रेक लागला आहे. कारण शुक्रवारी (१ फेब्रुवारी)पासून सुरू होणारी उबर वाॅटरटॅक्सी सेवा तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकलेली नाही. उबरनं ट्विटरवरून ही माहिती दिली असून ही सेवा आता नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे नक्कीच मुंबईकरांचा-पर्यटकांचा भ्रमनिरास झाला आहे.


उबर वाॅटरटॅक्सी सेवा

जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टनं उबर आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या सहाय्यानं वाॅटरटॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेट वे आॅफ इंडिया येथून एलिफंटा आणि मांडव्याला वाॅटरटॅक्सीनं जाता येणार आहे. खासगी टॅक्सीसेवेतील आघाडीच्या अशा उबरकडून वाॅटरटॅक्सी सेवा पुरवली जाणार आहे. उबर वाॅटरटॅक्सी अॅपच्या माध्यमातून टॅक्सीप्रमाणेच वाॅटरटॅक्सी बुक करता येणार आहे. ६ आणि १२ आसनांची अशी ही वाॅटरटॅक्सी असणार आहे.


असे असतील दर

भारतात पहिल्यांदाच मुंबईत वाॅटरटॅक्सी सुरू होणार आहे. त्यामुळे या वाॅटरटॅक्सीनं प्रवास करण्याची उत्सुकता सर्वांच आहे. मात्र त्याहीपेक्षा आधी या प्रवासासाठी मुंबईकरांना खिसा किती खाली करावा लागेल याचीच अधिक उत्सुकता होती. त्यानुसार मुंबईकरांनो गेट वे ते मांडवा या प्रवासासाठी सहा आसनी वाॅटरटॅक्सीसाठी ५७०० रुपये तर १२ आसनी वाॅटरटॅक्सीसाठी ९५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर प्रायोगिक तत्वावर सुरू होणार्या या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहत भविष्यात इतरही ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.



प्रतिक्षा करावी लागणार

अशा या सुपरफास्ट सेवेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी होणार होता. त्यामुळे अनेक मुंबईकर-पर्यटक पहिल्यावहिल्या वाॅटरटॅक्सीच्या प्रवासासाठी नक्कीच तयार झाले असतील. मात्र शुक्रवारी प्रत्यक्षात ही सेवा सुरू झालीच नाही. गुरूवारी रात्री उशीरा उबरकडून एका ट्विटद्वारे ही सेवा सुरू करण्यास विलंब होत असल्याचं जाहिर करण्यात आलं आहे. त्यामुळे बर्याच मुंबईकरांना-पर्यटकांना याची माहितीच नसल्यानं नक्कीच त्यांना भ्रमनिरास झाला असेल. त्याचवेळी ही सेवा कधी सुरू होणार हा प्रश्नच आहे. कारण त्याबाबत काहीही माहिती उबरकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता वाॅटरटॅक्सीतून प्रवास करण्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल हा प्रश्नच आहे. दरम्यान याविषयी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.



हेही वाचा -

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक

Budget 2019 : अंतरिम बजेट मांडण्यास सुरुवात



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा