Advertisement

मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मध्य रेल्वेने केला मोठा खुलासा

रेल्वेने राज्यांकडे एसओपी मागितल्याने पुढच्या आठवड्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू होण्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये खासकरून सोशल मीडियावर रंगली आहे.

मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मध्य रेल्वेने केला मोठा खुलासा
SHARES

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत महाराष्ट्रातील वाहतूक सेवा देखील हळुहळू सुरू होत असताना मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेल्वेने राज्यांकडे एसओपी मागितल्याने पुढच्या आठवड्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू होण्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये खासकरून सोशल मीडियावर रंगली आहे. त्यानुसार लोकल ट्रेन नेमकी कधी सुरू होणार यासंदर्भातील महत्त्वाचा खुलासा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेचं घसरलेलं गाडं हळुहळू रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्रात सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. 

हेही वाचा - केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे

याआधी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच सेवा पुरवणाऱ्या बेस्टने खासगी कर्मचाऱ्यांनाही सेवा पुरवण्यास सुरूवात केली आहे. टॅक्सी, रिक्षा सेवा मर्यादीत प्रमाणात सुरू आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना येणं-जाणं सोईचं व्हावं, यासाठी रेल्वे मंत्रालयाने मर्यादीत स्वरूपात मुंबई लोकल ट्रेनची सेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एकदा नव्हे, तर तीनदा लेखी पत्रं देखील पाठवली असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. प्रशासकीय पातळीवरून या मागणीचा पाठपुरावही करण्यात येत आहे.

त्यातच  रेल्वेने राज्यांकडे एसओपी मागितल्याने पुढच्या आठवड्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू होईल, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी खुलासा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये सुतार यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सुरू होण्याबाबत अनेक मेसेज फिरत आहेत. परंतु अशा कुठल्याही प्रकारची अधिकृत सूचना मिळालेली नाही. याबाबत सूचना मिळताच तशी माहिती देण्यात येईल. 

अशी माहिती सुतार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा